BMC Election 2022 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण निश्चिती आणि सोडत जाहीर

Brihanmumbai Municipal Corporation Election 2022 : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२२’ करिता २३६ प्रभागांपैकी जागांसाठीचे ‘आरक्षण निश्चिती’ आणि सोडत आज काढण्यात आली.
BMC Election news
BMC Election news saam tv

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Election 2022) निवडणुकांबाबत आरक्षण निश्चिती आणि सोडत जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी (BMC Election 2022) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यानुसार मुंबई महानगरपालिकेतील एकूण जागांपैकी १५ जागा या अनुसूचित जातींसाठी, २ जागा अनुसूचित जमातींसाठी आणि ६३ जागा या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता सोडण्यात आल्या आहेत. मुबंई महानगरपालिकेत एकूण २३६ जागा आहेत. या २३६ जागांपैकी ११८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, यापैकी ८ जागा अनुसूचित जाती (महिला), १ जागा अनुसूचित जमाती (महिला), ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी; तर ७७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. (BMC Election 2022)

हे देखील पाहा -

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२२’ करिता २३६ प्रभागांपैकी जागांसाठीचे ‘आरक्षण निश्चिती’ व सोडत आज काढण्यात आली. वांद्रे (पश्चिम) परिसरात असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, महानगरपालिकेचे उप आयुक्त (विशेष, निवडणूक) श्री. संजोग कबरे, सहाय्यक आयुक्त (करनिर्धारक व संकलक) श्री. विश्वास मोटे, ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विनायक विसपुते, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप निवडणूक अधिकारी श्री. सुधाकर ताडगे यांच्यासह संबंधित अधिकारी – कर्मचारी आणि नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. आजच्या सोडतीच्या सुरुवातीला महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आरक्षण निश्चिती व सोडत प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहाय्यक आयुक्त श्री. विश्वास मोटे यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'सार्वत्रिक निवडणूक -२०२२'च्या अनुषंगाने आरक्षण सोडत ही यापूर्वी ३१ मे २०२२ रोजी काढण्यात आली होती. तथापि, याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांन्वये व त्यानुसार मा. निवडणूक आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग निश्चिती करण्यासाठी आजची सोडत काढण्यात येत आहे. तसेच यापूर्वी अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गांसाठी ३१ मे २०२२ च्या सोडतीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तर आजच्या सोडतीमध्ये नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाकरिता आरक्षण निश्चयाने करण्यासह सोडत काढण्यात येत आहे.

यानंतर आजच्या आलक्षण निश्चिती व सोडतीच्या अनुषंगाने आवश्यक ती तांत्रिक माहिती उप निवडणूक अधिकारी श्री. सुधाकर ताडगे यांनी सहज-सोप्या भाषेत उपस्थितांना दिली. ज्यानंतर प्राधान्यक्रमानुसार आरक्षण निश्चिती व सोडतीचा प्रारंभ झाला. आज, शुक्रवारी संपन्न झालेल्या सोडती दरम्यान प्रभाग क्रमांकाची नावे लिहिलेल्या चिठ्ठया उचलण्याची कार्यवाही ही ‘एच पश्चिम’ विभागात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने केली. या सोडतीसाठी गेल्या ३ सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभागनिहाय आरक्षणाच्या आधारे यंदाच्या निवडणुकीसाठी प्राधान्यक्रम निर्धारित करण्यात आला होता. या अंतर्गत गेल्या ३ सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान ज्या प्रभागांमध्ये संबंधित आरक्षण नव्हते, त्यांना ‘प्रथम प्राधान्यक्रम’ निश्चित करण्यात आला होता. या प्रथम प्राधान्यक्रमानुसार 'नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग' यासाठी ५३ प्रभाग आरक्षित करण्यात आले.

दुसऱ्या प्राधान्यक्रमानुसार' नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग' यासाठी सन २००७ मध्ये आरक्षित असणारा; पण, गेल्या २ निवडणुकांमध्ये म्हणजेच वर्ष २०१२ व वर्ष २०१७ मध्ये सदर प्रवर्गासाठी आरक्षित नसणाऱ्या ५१ प्रभागांपैकी १० प्रभाग हे सोडत काढून निवडण्यात आले‌. यानुसार 'नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग' या प्रवर्गासाठी प्रथम प्राधान्यक्रमानुसार ५३; तर दुसऱ्या प्राधान्यक्रमानुसार १० प्रभाग; असे ६३ प्रभाग हे 'नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग' या प्रवर्गासाठी आरक्षित झाले.

BMC Election news
अजित पवारांनी पूरपरिस्थितीवरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; 'आम्ही उंटावरून...'

यानंतर कार्यक्रमादरम्यान 'नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग' यासाठी आरक्षित ६३ प्रभागांपैकी महिलांसाठी आरक्षित ३२ प्रभागांची निश्चिती ही प्राधान्यक्रम व सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली. सोडती दरम्यान सर्वांत शेवटी सर्वसाधारण १५६ प्रभागांपैकी महिलांसाठी आरक्षित असलेल्या ७७ जागांच्या आरक्षणाची निश्चिती ही प्राधान्यक्रमानुसार व सोडतीनुसार करण्यात आले. आज झालेल्या सोडतीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे हरकती नोंदविण्यासाठी २ ऑगस्ट २०२२ ही अंतिम तारीख असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com