Pandharpur Ashadhi Wari 2022: इंद्रायणीकाठी भक्तांची मांदियाळी; जयघोषाणं दुमदुमला परिसर

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३३७ व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात.
Pandharpur Ashadhi Wari 2022: इंद्रायणीकाठी भक्तांची मांदियाळी; जयघोषाणं दुमदुमला परिसर
Sant Tukaram Maharaj Palkhi SohalaSaam

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या ३३७ व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात होतं आहे. याच पार्श्वभूमीवर देहू नगरित पालखी सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांमध्ये एक वेगळंच चैतन्य संचारल्याचं दिसून येत आहे.

"हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास। पंढरीचा वारकरी ।वारी चुको नेदी हरी।" या अभंगातील ओळींप्रमाणे येथे जमलेल्या प्रत्येक वारकऱ्याची (Warkari) प्रामाणिक भावना इंद्रायणीकाठी दिसून येते आहे. कारण या हरीच्या दासांच्या पालखी सोहळ्यामध्ये तब्बल दोन वर्ष कोरोना महामारीमुळे (Corona) खंड पडला होता. दोन वर्षानंतर होत असलेल्या या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी इंद्रायणी काठी जमले असून मंदिराचा परिसर ग्यानबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमला आहे.

मंदीर परिसर फुलांनी सजवला -

दरम्यान, आज सकाळी देहू संस्थानाकडून (Dehu) महापूजा करण्यात आली आहे. तसंच पालखी सोहळ्या निमित्ताने मुख्य मंदिर गुलाब, जरबेरा शेवंती झेंडू अशा विविध फुलांनी मुख्य मंदिर सजवण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोना काळानंतर दोन वर्षांनी साजरा होत असणाऱ्या या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभमीवर प्रस्थान सोहळ्याला काही तास शिल्लक असतानाच, बॉम्ब शोधक पथकाने मुख्य मंदिराची तपासणी केली आहे.

या पालखी सोहळ्या निमित्ताने अनेक मान्यवर मुख्य मंदिरात येणार आहेत. तसंच पालखी सोहळ्याचं प्रस्थान २.३० वाजता होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

माऊलींचा अश्व पुण्यनगरीत -

जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा देहु (Dehu) नगरीतुन पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार आहे. तर आळंदीत देखील इंद्रायणी नदीचा घाट वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे गजबजुन गेला आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याकरिता लाखो वारकरी दाखल झाले आहेत.

दरम्यान, माऊलींच्या पालखी सोहळ्याला वेग आला असून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी आणण्यात आले होते. शितोळे सरदारांचे हे अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी थेट कर्नाटकाच्या अंकली गावातून आजच पुण्यनगरीत दाखल झाले आहे.

शांतिब्रह्मंची पालखी प्रस्थानासाठी सज्ज -

संत एकनाथ महाराजांच्या मानाच्या पालखीचे प्रस्थान आज सायंकाळी पैठणमधून (Paithan) होणार आहे. आज सकाळपासून गोदावरी तिरी असलेल्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आणि समाधी मंदिरात वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. एकनाथ महाराजांची पायी दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होत असल्याने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील हजारो वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी पैठणमध्ये दाखल झाले आहेत.

आज सूर्यास्ताच्यावेळी पंढरपूरच्या गोदावरी नदीच्या तीरावर प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यानंतर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान होईल. वारकरी संत सांप्रदायमध्ये पारंपारिक महत्त्व असलेल्या मानाच्या पालखी सोहळ्यापैकी तिसरा क्रमांक पैठण येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा आहे. या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास ३० ते ३५ हजार वारकरी सहभागी होतात.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com