Shivsena : अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून.., सामनातून जहरी टीका

शिवसेनेच्या सामना मुखपत्रातूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे.
Shivsena Slams Governor Bhagat Singh Koshyari
Shivsena Slams Governor Bhagat Singh Koshyari Saam Tv

Shivsena Slams Governor Bhagat Singh Koshyari : 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचं विधान राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. यावरूनच अनेक नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. अशातच शिवसेनेच्या (Shivsena) सामना मुखपत्रातूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

'शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या (Bhagat Singh Koshyari) धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल', अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

'भाजप व मिंधे गटाचा पाय राज्यपालांच्या धोतरात...'

'मराठवाडा विद्यापीठातील एका ‘राजकीय’ सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. हा विषय तूर्त बाजूला ठेवू, पण ‘‘शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला आहे', असा हल्लाबोलही सामनातून करण्यात आला आहे.

'मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले?'

वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? ‘‘शिवरायांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठवली’’ या विधानाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल, असे खडेबोल सुद्धा सामनातून सुनावण्यात आले आहेत.

'गरज संपताच त्याच शिवरायांचा अपमान करता?'

'शिवरायांचा विचार जुना झाला, असे आपले राज्यपाल बरळतात. मग पंतप्रधान मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित करण्याचे कारण काय? शिवाजी महाराजांनी गुलामगिरीविरुद्ध तलवार उपसली, पहिले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अफझलखानापासून औरंगजेबापर्यंत आक्रमकांची थडगी महाराष्ट्रात बांधली. त्याच शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागता आणि गरज संपताच त्याच शिवरायांचा अपमान करता?, असा संतापही सामनातून व्यक्त करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com