मुंबई महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत 'या' विषयांवर खलबतं, आदित्य ठाकरे म्हणाले...

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मुंबई महानगरपालिकेची पावसाळापूर्व आढावा बैठक आज गुरुवारी पार पडली.
मुंबई महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत 'या' विषयांवर खलबतं, आदित्य ठाकरे म्हणाले...
Aditya Thackeray Saam Tv

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मार्गदर्शनात मुंबई महानगरपालिकेची पावसाळापूर्व आढावा बैठक आज गुरुवारी पार पडली. मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयात पावसाळापूर्व विषयांच्या अनुषंगाने एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal singh chahal),अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, सर्व संबंधीत सहआयुक्त, उपआयुक्त, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त आणि विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

Aditya Thackeray
"हे तर रतन खत्रींचे आकडे"; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

पावसाळापूर्व आढावा बैठक पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत ज्या विषयांवर चर्चा झाली त्याबबतची माहिती ठाकरे यांनी माध्यमांना दिलीय. बैठकीत चर्चा झालेले महत्वाच मुद्दे खालीलप्रमाणे..

दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या डोंगर उतारांवरील वस्त्या

• बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या डोंगर उतारावरील ठिकाणी असणाऱ्या वस्त्यांमध्ये अपघातांची संभाव्यता लक्षात घेऊन आवश्यक ती उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले.

• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (NDRF) तीन तुकड्या सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सदैव तैनात असतात. या तीन तुकड्यांव्यतिरिक्त यंदाच्या पावसाळ्या दरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या आणखी तीन तुकड्या या दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये यंदा प्रथमच तैनात करण्यात येणार आहेत.

• या अतिरिक्त तीन तुकड्यांची कुमक ही मुंबई महानगरपालिकेच्या 'एस' विभाग, 'एम पश्चिम' विभाग आणि 'एन' विभाग तीन विभागांमध्ये स्वतंत्रपणे व सदैव तैनात असणार आहेत.

• दरडी कोसळण्याची संभाव्यता लक्षात घेऊन या तिन्ही तुकड्यांकडे सदर परिस्थितीत आवश्यक असणारी यंत्रसामुग्री उपलब्ध असणार आहे.

Aditya Thackeray
नागपूरात नालेसफाईच्या नावावर केवळ औपचारिकता!

• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या प्रत्येक तुकडीमध्ये ४५ जवानांचा समावेश असतो‌. यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १३५ जवानांचा समावेश असलेल्या तीन तुकड्या सदैव कार्यतत्पर असतात. याव्यतिरिक्त आता आणखी १३५ वाहनांचा समावेश असलेल्या तीन तुकड्या आपत्कालीन संभाव्यतेच्या दृष्टीने पावसाळ्यात कार्यतत्पर राहणार आहेत.

• दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.

पावसाळापूर्व नाले स्वच्छतेबाबत दिली माहिती

• पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे ही निर्धारित वेळापत्रकानुसार ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश.या दृष्टीने संबंधित अधिकाऱयांनी नियमितपणे क्षेत्रीय भेटी देऊन तिथे सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घ्यावा व आवश्यक ती कार्यवाही वेळच्यावेळी पूर्ण करवून घेण्याचे निर्देश.

• नालेसफाईनंतर काढलेला गाळ हा कोरडा झाल्यानंतरच हलविण्यात येतो. जेणेकरून त्याचे वजन कमी भरेल.

• मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नद्या व मोठे नाले याठिकाणी गाळ काढल्यानंतर ही पुन्हा गाळ येण्याची शक्यता असते.ही बाब लक्षात घेऊन निर्धारित कार्यपद्धतीनुसार अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे निर्देश.

• नाल्यांमधील गाळ काढला तरी नाल्यांच्या पृष्ठभागावर तरंगता कचरा हा सातत्याने येत असतो. याबाबत देखील सातत्यपूर्ण कार्यवाही करण्याचे निर्देश

• नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांना पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार पर्यायी व्यवस्था तत्पर ठेवण्याचे निर्देश

रस्तेकामांबाबत दिले निर्देश

• मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची पावसाळ्या दरम्यान अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियमित पाहणी व परिरक्षण करणे, रस्त्यांवर होणारे खड्डे भरण्यासाठी समन्वय साधणे आणि संबंधित तक्रारींचा सुयोग्य प्रकारे निपटारा करणे, यासाठी महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये 'समन्वय अधिकारी'अर्थात 'नोडल ऑफिसर' नेमण्याचे निर्देश.

• त्याचबरोबर दीर्घकालीन उपाययोजना म्हणून पुढील तीन वर्षांच्या रस्त्यांच्या कामकाजाचे नियोजन करणे व नियोजनानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश

घनकचरा व्यवस्थापन व उदंचन केंद्र

• पावसाळ्या दरम्यान घनकचऱ्याचे व्यवस्थापन सुयोग्य प्रकारे अधिक परिणामकारकपणे करणे गरजेचे आहे. या दृष्टीने आवश्यक तेथे दिवसातून दोन वेळा स्वच्छता करणे तसेच कचरा उचलण्याची कार्यवाही करणे.

• मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी विविध ठिकाणी पर्जन्य जल उदंचन केंद्रे (पंपिंग स्टेशन)कार्यरत आहेत. या उदंचन केंद्रांचे आणि विविध ४८० पेक्षा अधिक ठिकाणी बसविण्यात आलेल्या उदंचन संचांचे परिरक्षण व आवश्यक त्या बाबी पावसाळ्याच्या आधी व पावसाळ्या दरम्यान देखील वेळच्यावेळी करून घेण्याचे निर्देश.

वृक्षांची छाटणी

• बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी असणाऱया झाडांची छाटणी ही शास्त्रोक्त पद्धतीने व सुयोग्य प्रकारे करण्याचे निर्देश.

• जी झाडे धोकादायक परिस्थितीत आहेत, अशी झाडे शक्यतो सुरक्षित ठिकाणी पुनर्रोपित करावीत.

डेंग्यू - मलेरिया

• पावसाळ्यात दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यू, मलेरिया इत्यादी रोगांची बाधा वाढण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन कीटक नियंत्रण खात्याने आपल्या निर्धारित कार्यपद्धतीनुसार विविध सोसायट्या, वस्त्या इत्यादींमध्ये जाऊन नियमितपणे पाहणी करण्याचे व सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार वेळच्यावेळी कार्यवाही करण्याचे निर्देश.

संवाद उपक्रम

• ट्विटर, व्हॉटस् अॅप चॅटबॉट यासारख्या समाज माध्यमांचा वापर करून नागरिकांशी नियमितपणे संवाद साधण्याचे; तसेच विविध संवाद माध्यमांद्वारे नागरिकांच्या प्राप्त होणाऱया तक्रारींबाबत वेळच्या वेळी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश.

• विभागीय स्तरीय सहायक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील नागरिकांशी थेट संवाद साधावा.त्यांची मते व सूचना जाणून घ्याव्यात.त्यानुसार योग्य ती कार्यवाही वेळच्यावेळी करण्याचे निर्देश.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com