Maharashtra Politics : "एकनाथ शिंदे कमळाच्या जाळ्यात अडकले!" शिवसेनेच्या मुखपत्रातून बोचरी टीका

Eknath Shinde Latest News : बंडखोर आमदारांचा शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ वृत्तपत्रातून समाचार घेतला असून आजच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर शिवसेनेचे वीर ‘धर्म’ विसरले! असा मथळा देण्यात आला आहे.
Maharashtra Politics : "एकनाथ शिंदे कमळाच्या जाळ्यात अडकले!" शिवसेनेच्या मुखपत्रातून बोचरी टीका
Eknath Shinde Latest News In MarathiSaam Tv

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशीरा शक्तीप्रदर्शन केलं. आज एकनाथ शिंदे हे मुंबईत येऊन राज्यपालांची (Bhagatsingh Koshyari) भेट घेणार आहे. त्यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींवर शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे कमळाच्या जाळ्यात अडकले असं शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून म्हटलं आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

शिवसेनेच्या अग्रलेखात काय म्हटलं?

बंडखोर आमदारांचा शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' (Saamana) वृत्तपत्रातून समाचार घेतला असून आजच्या सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर शिवसेनेचे वीर ‘धर्म’ विसरले! असा मथळा देण्यात आला आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात पुढे म्हटलं आहे की, सरकार पाडण्यासाठी भाजपने टाकलेल्या या जाळ्यात शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे सहज फसले. ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि कारवाईला घाबरून शिंदे यांच्यासोबत गद्दार आमदार सुरतला पळाले. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या सोबत पळालेल्या आमदारांसोबत बंडखोर आमदारांना आता 'गद्दार' असल्याचं देखील म्हटलं आहे.

“शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी एका तळमळीने भाष्य केले. महाराष्ट्रात सत्तेचा माज चालणार नाही. केंद्रीय सत्तेचा माज दाखवून महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आईचे दूध विकणारी अवलाद शिवसेनेत नको, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत. असे लोक शिवसेनेत निर्माण व्हावेत ही महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानीच आहे. शिवसेना ही आई. तिच्या आणा-भाका घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आईच्या दुधाचा बाजार मांडला. त्या बाजारासाठी जागा निवडावी सुरतची. हा योगायोग समजायचा काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती व त्याच सुरतमधून आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयोग सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात महाराष्ट्राचे ठाकरे सरकार खुपत आहे, त्यापेक्षा जास्त शिवसेना खुपत आहे. त्यामुळे आधी शिवसेनेवर वार करा व मग महाराष्ट्रावर घाव घाला, असे राजकारण स्पष्ट दिसते,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

महाराष्ट्र जागा झाला

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' वृत्तपत्रातून पुढे म्हटलं गेलं की, "माणसे फोडायची, फितुरीची बिजे रोवायची, त्या फितुरीचे पिक खडकावरही काढण्यात हे लोक पटाईत, पण देशातील बेरोजगार 'अग्निवीर' रस्त्यावर उतरला आहे, कश्मीरात हिंदूंचे हत्याकांड सुरू आहे. लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही योजना व धमक त्यांच्यात दिसत नाही. फितूर निर्माण करायचे व त्या जोरावरच राज्य आणायचे. हीच यांची 'किंग मेकर्स' कंपनी. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने तेव्हा हेच केले. ही ईस्ट इंडिया कंपनीही शेवटी गाशा गुंडाळून निघून गेली. विधान परिषद निकालाने त्या ईस्ट इंडिया कंपनीचा आत्मा महाराष्ट्रात फडफडताना दिसला. बरे झाले, या निमित्ताने महाराष्ट्र जागा झाला.

Eknath Shinde Latest News In Marathi
असली गुवाहाटीत, नकली 'वर्षा'वर; मनसेनेकडून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

तलवारीला तलवार भिडेल हे नक्की

महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सामनातून म्हटलं गेलं की, महाराष्ट्र जागा झाला की पेटून उठतो, हा इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या फितूर मंडळाने लक्षात घ्यावा. महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे खरे प्रश्न आहेत. संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com