
Mumbai News: कर्नाटकातील भाजपच्या पराभवावरून ठाकरे गटाच्या दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर ठाकरे गटाने राहुल गांधीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे, असे म्हणत दैनिक 'सामना'तून भाजपला डिवचण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून ठाकरे गटाने कर्नाटकातील भाजपच्या पराभवावरून निशाणा साधला आहे. ' कर्नाटकचा निकाल मोदी-शहांच्या विरोधात गेला. कानडी जनतेने मोदी-शहांच्या भाजपचा मोठा पराभव केला. हा देशासाठी शुभशकुन आहे व त्यासाठी कानडी जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. काँग्रेस पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप 65 या आकड्यावरच लटकला, अशी टीका दैनिक 'सामना'तून भाजपवर करण्यात आली.
'महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे होते व त्यावर न बोलता भाजपवाले व त्यांचे दिल्लीचे नेते हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करून लोकांना भरकटवत राहिले. मोदी व शहांचा प्रचार व त्यांची भाषणे म्हणजे राजकीय थिल्लरपणाच होता, असा घणाघात दैनिक 'सामना'तून करण्यात आला.
'काँग्रेसने बजरंगबलीचा अपमान केला म्हणून भाजपास विजयी करा, असे सांगणे हा मोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव आहे. मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी करायला लावले. या सगळय़ाचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला.
'भारतातील सामान्य जनता हुकूमशाहीचा पराभव घडवू शकते, हा कर्नाटकच्या निकालाने दिलेला धडा आहे. कर्नाटकची जनता शहाणी आहे. हाच शहाणपणाचा संदेश आता देशभरात गेल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकात खऱ्या अर्थाने 'ऑपरेशन लोटस' झाले आहे, अशीही टीका दैनिक 'सामना'तून करण्यात आली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.