
Bhagat Singh Koshyari : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अडचणीत आले आहेत. कोश्यारींच्या विधानावरून महाविकासआघाडीने राज्यातील शिंदे-भाजप सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच, राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)
येत्या ५ डिसेंबरला गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी होऊ शकते, अशी शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा पार पडताच महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभर वातावरण तापलं आहे. त्यामुळे राज्यपाल कोशारीसंदर्भात केंद्राला निश्चितपणे एक ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते कोश्यारींवर टीका करत असताना, आता दुसरीकडे भाजप नेत्यांनी सुद्धा राज्यपालांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. (Maharashtra Politics News)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. राज्यपालांची चूक झाल्याचं सांगतानाच, त्यांना ठेवायचं की नाही, याचा निर्णय आमच्या हातात नाही, असंही बावनकुळे म्हणालेत. म्हणजेच, केंद्राकडून कारवाईचे संकेत आहेत का? अशीही चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांनी एवढी मोठी घोडचूक केली आहे, की त्यानंतर एखादा निर्लज्जच ‘त्या’ पदावर राहू शकतो, असा घणाघात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे बोलताना केला आहे.
दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्पा पार पडताच भाजपकडून राज्यपाल कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता आहे. कारण, गुजरातमध्येही पटेल, पाटीदार समाजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आदर आहे. गुजरातेतील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यपाल बदलले तर त्याचे काही प्रमाणात पडसाद उमटण्याची भाजपला धास्ती आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांना हटविताना ‘टायमिंग’ साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.