VIDEO | मुंबईत कालपासून धुव्वाधार पाऊस, अनेक भागात पाणीच पाणी

साम टीव्ही
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

१९७४ पासून सप्टेंबर महिन्यात २४ तासामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह अनेक ठिकाणी पाणी साचलं.

काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय. रात्रीपासून मुंबईत २८६.४ मिमी पावसाची नोंद झालीय. हा एवढा पाऊस अतीवृष्टीमध्ये गणला जातो. मुंबईमध्ये रात्रभर पडलेल्या पावसानं २६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलाय.

१९७४ पासून सप्टेंबर महिन्यात २४ तासामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह अनेक ठिकाणी पाणी साचलं.

पाहा व्हिडिओ -

मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशनमध्ये  मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्यामुळे रेल्वेरूळ पाण्याखाली गेले होते. तर माटुंगा स्टेशन परिसरही जलमय झाला होता. मुसळधार पावसाचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही झाला. मालाड, अंधेरी, खार, दादर या भागांतही पाणी भरल्यानं बेस्टनं अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली. सध्या पावसाचा जोर ओसरलाय. मात्र भारतीय हवामान खात्यानं येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.

मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. आज मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आलाय. त्यानुसार या जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पालघरच्या काही भागांत अतिवृष्टीची शक्यताय. मुंबईत वाढलेल्या पावसाच्या जोरामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झालाय.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतल्या रेल्वे सेवेलाही बसलाय. मुसळधार पावसामुळं CSMT ते Thane आणि CSMT ते Vashi दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. सायन स्टेशनच्या रेल्वे रुळावर पाणी साचलंय. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं रेल्वे सेवेला याचा फटका बसला.

दरम्यान ठाणे आणि कल्याणदरम्यान शटल सर्विस सुरू करण्यात आली. तसच वाशी आणि पनवेल दरम्यानही शटल सेवा सुरु करण्यात आली.  चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती.


संबंधित बातम्या

Saam TV Live