चेंबूरमधील इमारतींना पालिकेच्या नोटिसा

साम टीव्ही
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. विशेषतः मुंबईतील चेंबूर परिसरात आठवडाभरापूर्वी दररोज १५ पेक्षा कमी कोरोना रूग्णांची नोंद होत होती, मात्र आता ती संख्या २५ वर पोहचलीय. 

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. विशेषतः मुंबईतील चेंबूर परिसरात आठवडाभरापूर्वी दररोज १५ पेक्षा कमी कोरोना रूग्णांची नोंद होत होती, मात्र आता ती संख्या २५ वर पोहचलीय. त्यामुळे इथल्या तब्बल ५५० हून अधिक इमारतींना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत . 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. कोरोनाबाबतचे नियम पायदळी तुडवत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क वावरणाऱ्या चेंबूरमधील नागरिकांच्या याच बेफिकीरपणाला लगाम घालण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे . यामुळे गेल्या पाच दिवसांमध्ये चेंबूरमधील तब्बल ५५० इमारतींना पालिकेने नोटीस बजावलीय. कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास इमारती सील करण्याचा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांची सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता सोसायटी आणि फेरीवाल्यांना कोरोनाची चाचणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.  

बाहेरील व्यक्तींना सोसायटीमध्ये मर्यादित प्रवेश देण्याची सूचना करण्यात आली असून, सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रहिवाशाचा ताप तपासण्याचं सुचवण्यात आलंय. त्याचसोबत, इमारतीत रहिवाशाला कोरोनाची बाधा झाल्यास १४ दिवस क्वारंटाईन करणं बंधनकारक करण्यात आलंय. लक्षणं आढळलेल्या आणि कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आलीय.
 

 चेंबूरमधील प्रभागातील कोरोनामधील रुग्णांचा वाढीचा दर ०.२८ टक्के आहे, तर मुंबई महापालिकेच्या ‘एम-पश्चिम’ विभागातील ९८ टक्के रुग्ण हे निवासी इमारतीमध्येच सापडले आहेत. त्यामुळे, महापालिकेने चेंबूरमधील निवासी इमारतींसाठी नवी नियमावली जारी केलीय. म्हणूनच, अनलॉक जाहीर झाला असला तरी, चेंबूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने सतर्क राहत काळजी घ्यायला हवी. कारण, पुन्हा कडक लॉकडाऊनची वेळ येऊ न देणं आपल्याच हातात आहे.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live