राणेंचे कोकणात '..खेळ चाले'...

विनीत डंभारे
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

 

 

सिंधुदुर्ग : करुन गेलो गाव.. वस्त्रहरण.. मालवणी सौभद्र... रात्रीस खेळ चाले... अशा अनेक कलाकृतींच्या माध्यमातून कोकणातल्या वैभवसंपन्न संस्कृतीची ओळख
सर्वसामान्यांना झाली... तर मासेप्रेमी खवय्येंचीही पहिली पसंती कोकणालाच असते... एवढंच कशाला, फळांचा राजा 'हापूस आंबा'देखील कोकणातलाच..
काजूगरे, फणस यांची जिभेवर रेंगाळणारी चव तर अप्रतिमच...
तर या चवीवरुन आठवलं... की सध्या कोकणात आणखी एक विषय चवीचवीने चघळला जातोय... अन् तो म्हणजे राणे पिता-पूत्र आणि शिवसेनेतला कलह...
भांड्याला भांड लागणं हे कधीतरीच घडतं. पण राणे आणि शिवसेना... नुसता उच्चार जरी एकत्र केला तरी वाद ठरलेलाच... अन् हा आवाज केवळ कोकणापूरताच मर्यादित राहत नाही...
तर युतीच्या माध्यमातून आधी राज्याच्या आणि नंतर दिल्लीच्या कानाकोपऱ्यात घुमत राहतो... राज्यात सध्या निवडणुकीचं वारं जोरात वाहू लागलंय... आणि कोकणात तर नुसतं धुमशानच.. 
त्यातच राणे पिता-पुत्रांच्या राजकीय हालचालींनी वादळ उठलंय... भाजपच्या तिकीटावर नारायण राणेंनी संसदेतली जागा पटकावली खरी... पण, भाजप प्रवेश रेंगाळलेलाच... तर बापसे बेटा सवाई 
म्हणत, नितेश राणेंनी भाजप प्रवेशही केला... अन् कणकवलीतून उमेदवारीदेखील मिळवली... पण नितेश राणेंच्या या उमेदवारीने युतीतला तणाव मात्र चांगलाच वाढला... राणेंशी आधीच वाकडं असलेल्या 
शिवसेनेने युतीचा धर्म धाब्यावर बसवत, आपला स्वत:चा उमेदवार दिला... त्यामुळे बिनधास्त, बेधडकपणे वावरणाऱ्या राणेंच्या तळपायाची आग मस्तकाच गेली नसती तरच नवल.. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे
पुन्हा राणे-शिवसेना संघर्ष पेटला... वाढता तणाव पाहून मुख्यमंत्री फडणवीसांनी 'सबका साथ'चं तंत्र राणे पिता पुत्रांकडून सल्ल्याच्या माध्यमातून घोटवून घेतलं... अन् वणवा विझवण्याचा प्रयत्न केला... पण
सहजासहजी विझेल तो कोकणातला वणवा कसला... 
नितेश राणेंनी शिवसेनेबाबत वक्तव्य न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर, राणेंचे मोठे पूत्र निलेश राणेंच्या भात्यातला बाण सुटला.. त्यांनी थेट लहान भावाच्या भूमिकेवरच ट्विटरच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित
केलं... मग मीडियानेही, उमेदवारीवरुन भावांमध्ये वितुष्ट वाढल्याची बातमी चालवली... मग राजकीय दबावही आला.. अखेरीस, बहुदा... निलेश राणेंच्या साहेबांच्या (नारायण राणे) आदेशानंतर त्यांनी 
नरमाईची भूमिका घेतली.. पत्रकार परिषद घेऊन, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला... मला तसं म्हणायचं नव्हतं.. लहान भावासोबत मी शेवटच्या श्वासापर्यंत उभा राहणार... वगैरे, वगैरे असं बरंच काही
म्हंटलं... पण पत्रकार परिषद संपता संपता, निलेश राणेंनी पुन्हा शिवसेना राग आळवत, शांत समुद्रात वादळ उठवण्याचा प्रयत्न केलाच... जोवर शिवसेना एक पाऊल मागे हटणार नाही, तोवर मीसुद्धा मागे
हटणार नाही, अशी थेट भूमिका मांडत.. पुन्हा राणे-शिवसेना वादात तेल, डिझेल, पेट्रोल ओतण्याचं काम केलं... त्यामुळे येत्या काही दिवसांत कोकणातलं राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार
एवढं निश्चित..
पण तुम्ही डोक्याला जास्त ताण घेऊ नका... कारण निवडणुका संपल्यानंतर, पर्यटकप्रेमी कोकणी माणूस, 'येवा कोकण आपलाच असा..' अशा आविर्भावात आपल्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे...
 


संबंधित बातम्या

Saam TV Live