
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या नेपाळच्या खासगी दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी भाजपनं मंगळवारी त्यांचा एक व्हिडिओ शेअर करून निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे एका नाइट क्लबमध्ये दिसतात. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर करून काँग्रेसवर निशाणा साधला. आता काँग्रेसनेही भाजपवर पलटवार केला आहे. काँग्रेसने भाजप नेते प्रकाश जावडेकर यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात ते शॅम्पेनची बाटली उघडताना दिसत आहेत.
काँग्रेस नेते आणि खासदार मणिकम टागोर यांनी प्रकाश जावडेकर यांचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्याचबरोबर हा कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. तत्पूर्वी, राहुल गांधी यांचा पबमधील व्हिडिओवरून मंगळवारी भाजप आणि काँग्रेस (BJP vs Congress) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवरून राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हेकेशन, पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप असे खासगी विदेशी दौरे आता देशासाठी नवीन नाहीत, अशा शब्दांत रिजिजू यांनी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर पलटवार केला आहे. राहुल गांधी हे नेपाळमध्ये आपल्या एका मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. कुणाच्या लग्नात सहभागी होणे हा कोणता गुन्हा नाही. कदाचित यानंतर कुणाशी मैत्री करावी, मित्र कोण असावा, कुणाच्या लग्नात सहभागी होणे बेकायदेशीर आहे, हे भाजपने ठरवावे, असा टोला त्यांनी लगावला.
'आम्ही पार्टीसाठी काम करतो, ते पार्टी करतात'
दुसरीकडे, भाजप नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री शाहनवाझ हुसैन यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना पार्टी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ते पार्टीचा (काँग्रेस) कारभार चालवण्यापेक्षा जास्त वेळा ते पार्टीत सहभागी होतात. आम्ही राजकीय पार्टीसाठी काम करतो, पण ते पार्टीत सहभागी होतात, असा टोला त्यांनी लगावला.
सूरजेवालांनी केला नवाझ शरीफ यांचा उल्लेख
रणदीप सूरजेवाला यांनी भाजपवर पलटवार करताना नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सत्ताकाळात दिलेल्या लाहोर भेटीचा उल्लेख केला. राहुल गांधी नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी नेपाळला गेले नााहीत, असा घणाघात सूरजेवाला यांनी केला.
Edited By- Nandkumar Joshi
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.