शिंदे यांच्याकडून आज मोठा निर्णय? पुढच्या काही तासांत मोठी घडामोड होण्याची शक्यता

एकनाथ शिंदे नक्की काय भूमिका घेणार याकडे राज्यभरातील शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSaam TV

गुवाहाटी : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजता शिंदे गटाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्याला तीन दिवस उलटून गेले असली तरी देखील आपण शिवसेनेसोबत असून शिवसेना (Shivsena) सोडणार नसल्याचं शिंदेंकडून सांगण्यात येत आहे. मात्र शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत गद्दारी केल्याचा सुर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कालच्या बोलण्यातून समोर येत होता. त्यामुळे आता शिंदे नक्की काय भूमिका घेणार याकडे राज्यभरातील शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे देखील पाहा -

अशातच आता शिंदे आपली भूमिका जाहीर करणार असल्याची मोठी बातमी समोर येत असून यासाठी त्यांनी आज त्यांच्या गटाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर ते राज्यपालांना वेगळ्या गटाचं पत्र देणार असल्याचं समजतं आहे. शिवाय या सर्व पार्श्वभूमीवर हॉटेल रेडिसन ब्लू समोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून हॉटेल बाहेर हालचालींना वेग आला असल्याचं देखील सुत्रांनी सांगितलं आहे.

सरकारचा पाठिंबा काढणार ?

दरम्यान, आघाडीत सगळं अलबेल असून सरकारला कसलाही धोका नसल्याचा दावा सरकारमधीन काही नेते करत आहेत. मात्र, शिंदे यांच्याकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. अशातच काल गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) योगेश कदम, निर्मला गावित आणि चंद्रकांत पाटील हे आमदार गुवाहाटी (Guwahati) मधील 'रेडीसन ब्लू' हॉटेलमध्ये पोहोचल्यामुळे, सरकारसह मातोश्रीवरील नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आज महाविकास आघाडीचा पाठिंबा काढणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय याबाबत ते राज्यपालांना पत्र पाठवणार असल्याचं देखील समजत आहे.

मातोश्रीवरही बैठक -

एकीकडे एकनाथ शिंदे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवाय त्यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या देखील वाढत आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेची बैठक बोलवली असून या बैठकीसाठी सचिव, नेते, सोबत असलेले आमदार, खासदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.

Eknath Shinde Latest News
'हे वादळ दोन दिवसात शांत होईल, सरकार पडणार नाही; आमदारही परत येतील'

शिवसैनिक आक्रमक -

एकनाथ शिंदे यांच्याकडील आमदारांचा आकडा वाढत असला तरी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा वर्षा बंगला सोडल्यापासून शिवसैनिक चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मुख्यमंत्र्यांना बंगला सोडायला भाग पाडलेल्यांना शिवसैनिक माफ करणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com