
नवी दिल्ली: गलवान खोरे संघर्षात (Galwan Valley) शहीद झालेल्या जवानाची वीरपत्नी रेखा सिंग या भारतीय लष्करात लेफ्टनंट बनल्या आहेत. 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झडप झाली होती. या संघर्षात भारतीय लष्कराचे लान्स नाईक दीपक सिंग (Martyred Deepak Singh) यांना वीरमरण आलं होतं. मरणोत्तर त्यांना वीर चक्रही प्रदान करण्यात आलं. आता त्यांच्या पत्नी रेखा सिंग यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट (Lieutenant Rekha Singh) पदासाठी निवड झाली आहे. वैद्यकीय औपचारिकता पूर्ण केल्यानंतर रेखा चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतील.
मूळ मध्यप्रदेशातल्या रीवा जिल्ह्यातील असलेल्या दीपक सिंग यांना लग्नाच्या अवघ्या 15 महिन्यानंतरच वीरमरण आलं. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांनी देशासाठी लढताना आपलं बलिदान दिलं. दीपक सिंग हे बिहार रेजिमेंटमध्ये लान्स नायक म्हणून कार्यरत होते. 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले. या संघर्षात भारतीय जवानांनी चीनी सैन्याविरुद्ध जोरदार लढा दिला. भारतीय सैन्याचा संघर्ष पाहून चीनी सैनिक पळून गेले. सुरूवातीला चिनीने आपले सैनिक मारले गेले नसल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर चीनचे शेकडो सैनिक या संघर्षात मारले गेले असल्याचं वृत्त ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं दिलं होतं.
दीपक सिंग यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या पत्नी रेखा सिंग यांच्या मनात देशभक्तीची भावना होती. त्यामुळेच मी शिक्षिकेची नोकरी सोडून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतल्याचे रेखा यांनी सांगितले. रेखा म्हणतात, "सैन्यात भरती होण्याचे स्वप्न घेऊन मी तयारीसाठी नोएडाला आले. जिथे प्रवेश परीक्षेच्या तयारीबरोबरच मी शारीरिक प्रशिक्षणही पूर्ण केले. मात्र, प्रशिक्षण आणि अभ्यास करूनही पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. असे असूनही मी धीर सोडला नाही. दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले".
दरम्यान, रेखा यांचे प्रशिक्षण चेन्नईत २८ मे पासून सुरू होणार आहे. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्यांना लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू केले जाईल. आपल्या वीरपतीची आठवण काढताना रेखा म्हणतात, "लग्नानंतर पहिल्यांदाच दीपक होळीच्या सुट्टीत घरी आले होते. त्यावेळी त्यांनी मला काश्मिरी शाल आणि लेहेंगा आणण्याचे आश्वासन दिले होते. शहीद होण्याच्या 15 दिवस आधी त्यांनी माझ्यासोबत फोनवर संवादही साधला होता. त्यानंतर त्यांच्या वीरमरणाची बातमी आली." ज्या धैर्याने दीपक सिंग यांच्या पत्नी रेखा यांनी सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले ते खरंच अभिमानास्पद आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.