
नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टपणे सांगितले असतानाच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह डाव्या पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी दिवसभरात त्यांची भेट घेतली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार तुम्ही व्हावे, असा आग्रह धरला. मात्र, शरद पवार यांनी त्यास नकार दिला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून उमेदवार म्हणून उभे राहण्यास शरद पवार यांनी नकार दिला, अशी माहिती माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिली. (Presidential Election)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, पी. सी. चाको यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी पवार यांनी आपण राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवणार नाही, असे त्यांना सांगितले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शरद पवार हे विरोधी पक्षांचे उमेदवार नसतील अशी माहिती मला देण्यात आली. अन्य नावांवर विचार करण्यात यावा, असेही सांगितल्याचे येचुरी म्हणाले.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दिल्लीत गेल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे. आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्तपणे रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी या भेटीबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी माझ्या दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली. आपल्या देशातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली, असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवाराच्या सर्व सहमतीसाठी १५ जून रोजी दिल्लीत बैठक बोलावली आहे. राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.