उदयनराजेंना राष्ट्रवादी घेरणार ? 

 उदयनराजेंना राष्ट्रवादी घेरणार ? 

मुंबई : सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्याचबरोबर पक्षांतराचे देखील वारे घुमू लागले आहे. विरोधी पक्षातील बरेच आमदार, खासदार सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उदयनराजे यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे सरसावली आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसंच माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.

'खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी,' या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांशीही उदयनराजेंनी कधी जुळवून घेतलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई कामी आली. विशेष म्हणजे यावेळी खुद्द शरद पवारांनी उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवली होती.


Web Title: Ncp candidate against mp udayanraje bhosale in satara bypolls
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com