राष्ट्रवादीचे शिवसेनेवर "सर्जिकल स्ट्राइक'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का असून, श्री. महाले यांनी शिवबंधन काढून हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेवर केलेले हे सर्जिकल स्ट्राइकच मानले जात आहे. 

मनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का असून, श्री. महाले यांनी शिवबंधन काढून हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेवर केलेले हे सर्जिकल स्ट्राइकच मानले जात आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या संघर्ष यात्रेदरम्यान गुरुवारी मनमाडमध्ये महर्षी वाल्मीकी स्टेडियममध्ये झालेल्या निर्धार सभेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व अजित पवार यांनी महाले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रवादीत तुम्हाला व तुमच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही श्री. भुजबळ व पवार यांनी महाले यांना दिली. देशातील व राज्यातील जनता भाजपला कंटाळली असल्याने, आगामी काळात केंद्र व राज्यात सत्तापरिवर्तन करण्याचा निर्धार आता जनतेनेच केला असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. श्री. पवार म्हणाले, की महाले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत दिंडोरीचा खासदार हा राष्ट्रवादीचा असेल. डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडला असतानाही त्याच्यावर थातुरमातुर कारवाई करण्यात आली. खरेतर हे प्रकरण गंभीर असून, कोणाला मारण्यासाठी हे हत्यार आणण्यात आले होते? त्यामागचा मास्टर माइंड कोण, याचा शोध घेण्याऐवजी त्याला का सोडून देण्यात आले, असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला. मनमाड शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, रईस फारुकी, साहेबराव पाटील, साहेबराव मढवई आदींची या वेळी भाषणे झाली. माजी आमदार जयंत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, श्रीराम शेटे, मायावती पगारे आदी व्यासपीठावर होते. 

डान्स बारमुळे तरुण पिढीचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत आहे. त्यामुळे आमच्या सरकारने डान्स बारवर बंदी घातली होती. मात्र, भाजप सरकारने कोर्टात व्यवस्थितपणे बाजू मांडली नाही. त्यामुळे डान्स बारवर असलेली बंदी उठविण्यात आली. आमचे सरकार आले, तर डान्स बारवर बंदी आणणारा कडक कायदा करू. 
-अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री 

Web Title: NCP surgical strike on Shiv Sena


संबंधित बातम्या

Saam TV Live