शेतकऱ्यांची पंसती स्प्रिंकलरला, ठिबकसाठी शेतकऱ्यांचे नऊ हजार अर्ज 

 शेतकऱ्यांची पंसती स्प्रिंकलरला, ठिबकसाठी शेतकऱ्यांचे नऊ हजार अर्ज 

उस्मानाबाद : यंदा अंतिम टप्प्यात दमदार पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. सध्या विहिरी, कूपनलिकांना काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर करीत स्प्रिंकलर, ठिबक सिंचनद्वारे पिकांना पाणी देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. अनुदानावर मिळणाऱ्या स्प्रिंकलर, ठिबक संचासाठी जिल्ह्यातील जवळपास नऊ हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत.

 जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. त्यातच उन्हाळ्यामध्ये अनेक गावांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. शिवारातील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडत असल्याने टॅंकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये पिकांना जगविण्यासाठी पाणी कोठून उपलब्ध होणार, हा प्रश्न असतो. त्यामुळे बागायती क्षेत्रही कमी होत आहे. ही परिस्थिती शेतकरी सातत्याने अनुभवत आहेत.

यंदा पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात दमदार पावसामुळे विहिरी, कूपनलिकांना काही प्रमाणात पाणी आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर करून रब्बी हंगामातील पिके जगविण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत. पाटाने पाणी दिल्यास आगामी काळात पाणीटंचाईची शक्‍यता गृहीत धरून आता काही शेतकरी स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचनद्वारे पिकांना पाणी देत असल्याचे चित्र आहे.

स्प्रिंकलर, ठिबक संचासाठी कृषी विभागाकडे अनुदानावरील योजना आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये बहुभूधारक शेतकऱ्यांना 75 टक्के, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान देण्यात येते. यंदा आतापर्यंत जिल्ह्यातील आठ हजार 984 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एक हजार 419 शेतकऱ्यांनी हे संच घेतले आहेत. त्यातील 485 शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. 
जिल्ह्यात सध्या बहुतांश शेतकरी रब्बी हंगामातील हरभरा, गहू ही पिके जगविण्यासाठी स्प्रिंकलर व ठिबक संचाचा वापर करीत आहेत. उसाच्या पिकालाही ठिबकद्वारे पाणी देण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. 
 
स्प्रिंकलर, ठिबक संच घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. आतापर्यंत एक हजार 419 शेतकऱ्यांनी हे संच खरेदी केले असून, त्यापैकी 485 जणांना अनुदान अदा करण्यात आले आहे. 

Web Title: News about sprinkler system

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com