चिंताजनक! ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवा विषाणू, यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध

साम टीव्ही
सोमवार, 21 डिसेंबर 2020
  • ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवा विषाणू
  • ब्रिटिश कोरोनाची जगभरात भीती
  • नव्या कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध

कोरोनाचं संकट टळलेलं नसताना आता ब्रिटनमध्ये एका नव्या प्रकाराच्या विषाणूची भर पडलीय. त्यामुळे जगावर आणखी एक संकट ओढवलंय. या विषाणूच्या भीतीनं अनेक देशांनी पुन्हा एकदा निर्बंध लागू केलेत. 

वर्ष उलटलं तरी कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. त्यातच आता ब्रिटनची राजधानी लंडनसह इंग्लंडच्या पूर्व भागात कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग वेगानं फैलाव होतोय. काही दिवसांपूर्वी हा विषाणू आढळला होता. या विषाणुमुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यानं सरकारनं लॉकडाउनचे निर्बंध लागू केलेत..त्यापाठोपाठ युरोपीयन देशांसह इतर देशांनीही ब्रिटनमधील विमान सेवेवर बंदी घातलीय. कोरोनाचा हा नवीन प्रकार फक्त ब्रिटनपुरता मर्यादित न राहता इटली, नेदरलँड्स, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत वेगानं पसरतोय. 

ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा करोना विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक वेगाने फैलावतो. लंडन आणि दक्षिण इंग्लंडच्या भागात हा विषाणू वेगानं फैलावण्याची भीती व्यक्त होतीय. बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रविवारपासून ब्रिटनमध्ये कठोर नियमांसह लॉकडाउन सुरू करण्यात आलंय. त्यामुळे लाखो नागरिकांवर पुन्हा एकदा घरातच थांबवण्याची वेळ आली. 

ब्रिटनसोबतची विमानसेवा बंद

नेदरलँड्सनं ब्रिटन दरम्यान सुरू असणाऱ्या विमान सेवेवर या वर्षाखेरपर्यंत बंदी घातलीय.. तर बेल्जिअमनं ब्रिटनसोबतची रेल्वे सेवाही स्थगित केली आहे. याशिवाय जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, इटली, सौदी अरेबिया या देशांनी ब्रिटनसोबतची विमान सेवा स्थगित केलीय. 

नव्या कोरोनामुळे युरोपीयन संघातील देश सतर्क झाले आहेत. तर भारतानेही खबरदारीचा उपाय म्हणून पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. हा नवा विषाणू कितपत घातक आहे. त्याचा मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास सुरू आहे. ऐन ख्रिसमसच्या तोंडावर हे नवं संकट आल्यानं सर्वांच्याच उत्साहावर विरजण पडलंय. आता या नव्या कोरोनाचा सामना कसा करायचा? याचं देखील एक मोठं आव्हान सर्वांसमोर असेल.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live