पुण्याजवळ होणार नवी महापालिका ?

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 12 मार्च 2020

शहराची वाढलेली लोकसंख्या पाहून नवी महापालिका करण्याबाबत सकारात्मक पावले उचलाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

पुणे: लवकरच नवी महापालिका करण्याबाबत सकारात्मक पावले उचलू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले. याबाबत निर्णय घेताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.शहराची वाढलेली हद्द, त्यातील लोकसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि त्यावरील प्रशासकीय नियंत्रण पाहता हा निर्णय घेण्यात येणारेय.

नवी महापालिका होणार?

शहराचा पूर्व भाग म्हणजे येरवडा, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, हवेली तालुक्‍यातील वाघोलीसह नव्या काही गावांसाठी हडपसरमध्ये स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी आहे. त्यावर गेली काही वर्षे फक्त चर्चा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दृष्टीने जुन्या-नव्या सरकारने पावले उचललेली नाहीत.

पुणे महापालिकेच्या हद्दीतील काही भागांसह नव्या गावांतील पायाभूत सुविधांकडे आमदार भीमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप यांनी लक्ष वेधले होते. त्यावर पवार म्हणाले, "वाघोलीसह सर्व भागांना पाणी, रस्ते, आरोग्य या गरजेच्या सुविधा पुरविल्याच पाहिजेत. मात्र, या भागांच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी आहे. त्यावर निर्णय घ्यावा लागेल. परंतु, त्याआधी सगळ्यांशी चर्चा केली जाईल.'

ग्रामपंचायतीनुसार करआकारणी होणार?
महापालिकेतील नव्या गावांसह जुन्या गावांतील रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील, असे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नव्या अकरा गावांत कामे करण्यात महापालिकेला अपयश आले असून, त्यामुळे या गावांतील मिळकतींना महापालिकेऐवजी ग्रामपंचायतीच्या दरानुसार करआकारणी करावी, असा आग्रह आमदार संजय जगताप यांनी धरला. 

WEB TITLE- New municipality to be located near Pune


संबंधित बातम्या

Saam TV Live