अमित ठाकरेंवर महापालिका निव़डणुकीची धुरा, राज ठाकरेंनी मुलावर टाकला विश्वास

साम टीव्ही
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021
  • राज ठाकरेंनी मुलावर टाकला विश्वास
  • अमित ठाकरेंवर नवी जबाबदारी
  • अमित ठाकरेंवर महापालिका निव़डणुकीची धुरा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेनं जोरबैठकांना सुरूवात केलीय. अमित ठाकरेंना मुंबई महापालिकेतल्या प्रचारात सक्रिय करण्याचा निर्णय मनसेनं घेतलाय.

अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलीय. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षात काही बदल केलेत. गेल्यावर्षी मनसेच्या नेतेपदी नियुक्ती झालेल्या अमित ठाकरेंवर आता मुंबई महापालिकेच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आलीय. 

अमित ठाकरे यांच्यावर उत्तर-पूर्व विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यांच्या मदतीला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे सुद्धा असणार आहेत. तर दक्षिण मुंबईची जबाबदारी नितीन सरदेसाई आणि मनोज चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आलीय.

मात्र कल्याण डोंबिवलीतल्या पक्ष गळतीमुळे मनसेत अस्वस्थता आहे. कृषी कायदे आणि वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सर्वच बड्या पक्षांचे नेते या मुद्यांवर बोलत असताना मनसे नेतृत्व मात्र या विषयावर स्पष्टपणे बोलत नसल्याने पक्षात काहीसा संभ्रम आहे. शिवाय पक्षातल्या अंतर्गत राजकारणामुळे पक्षातील पदाधिकारी कंटाळल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना आणि नव्याने पक्ष बांधणी याबद्दलही चर्चा झाल्याचं समजतंय. 

गेल्या काही दिवसात पक्षात विशेष हालचाल दिसून अलेली नाही. कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांत पक्षाने कोणताही आंदोलन किंवा कार्यक्रम हाती घेतलेला नाही. त्यामुळे अमित ठाकरे पक्षात सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारणार का हे पाहणं महत्वाचं असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live