कोरोनाला रोखायचं तरी कसं? वाचा राज्यातील कोरोनाच्या काही महत्वाच्या बातम्या

कोरोनाला रोखायचं तरी कसं? वाचा राज्यातील कोरोनाच्या काही महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांचा वाढता आकडा

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या  महाराष्ट्राची चिंता आणखी वाढणार आहे. राज्यात रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 661 वर गेलेय.  आज एका दिवसात 26 रुग्ण वाढलेत. दरम्यान पुणे-17, पिंपरी चिंचवड- 4, अहमदनगर 4,  औरंगाबाद 2 असे हे रुग्ण आढळलेत. तर आतापर्यंत ३४ जणांचे राज्यात मृत्यू झालेत. 

डोंबिवलीतून क्वारंटाईन असलेला रुग्ण फरार

डोंबिवलीतील एका रुग्णालयातून एक क्वॉरंटाइन केलेली व्यक्तीच पळून गेल्याने खळबळ उडालीय. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानं या व्यक्तीला क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस या व्यक्तीचा शोध घेतायत. दरम्यान, रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्यानेही ही व्यक्ती पळून गेल्याची चर्चा आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 24 पैकी पाचजणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय.  तर, अजूनही 19 जण उपचार घेत आहेत.

10 फिलिपाईन्स नागरिकांमुळे नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव झाल्याचा आरोप

10 फिलिपाईन्स नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या नागरिकांमुळे कोरोना पसरल्याचा आरोप करण्यात आलाय. काही दिवसांपासून या नागरिकांचं शहरात वास्तव्य आहे. कोणतीही सूचना न देता, या नागरिकांनी शहरात वास्तव्य केलंय...या प्रकरणात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी एका जणाचा कोरोनामुळेच मृत्यू झाला होता. नवी मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 25 रुग्ण आढळलेत.

जळगावमध्ये २ कोरोना संशयीतांचा एका रात्रीत मृत्यू

जळगावमध्ये 2 कोरोना संशयितांचा रात्री मृत्यू झाला आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे दोघे भरती झाले होते. मात्र काल रात्री याच त्रासात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या आधीच रुग्णालयाकडून या दोघांचेही स्वॅप घेण्यात आले होते. हे नमुने आता तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आज तपासणी अहवाल आल्यानंतर हे दोघांचे बळी कोरोनानं घेतले की नाही हे स्पष्ट होईल. जळगावात याआधीही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय.

मुंबईत आज भाजी खरेदीवर निर्बंध येण्याची शक्यता

मुंबईत आता भाजी खरेदीवर निर्बंध येण्याची शक्यता आहे...भाजी खरेदीसाठी होणारी मुंबईकरांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भाजी खरेदीवर निर्बंध आणण्यासाठी मुंबई पालिकेचा विचार सुरू आहे. यात नगरसेवकांचे 2 किंवा 3 प्रभाग मिळून एकाच जागी भाजीविक्री केंद्र उभारून, तिथे भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाची नोंद केली जाणार असल्याचं समजतंय. एकदा ग्राहकाची भाजी मार्केटमध्ये नोंद झाल्यानंतर त्या ग्राहकाला आठवड्यानंतरच भाजीमार्केटमध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे ग्राहकांना आठवड्याभराची भाजी एकदाच खरेदी करावी लागणार आहे. यासंदर्भातला प्रस्ताव सध्या पालिका पातळीवर तयार करण्यात आलाय. लवकरच तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.

मालेगावला लॉकडाऊनमधून वगळण्यात आलंय का?

मालेगावला लॉकडाऊनमधून वगळलंय का? असा प्रश्न पडावा अशी ही बातमी आहे. कारण पोलिस कारवाईला न जुमानता आजही पॉवरलूम सुरु असल्याचं समोर आलंय. या पॉवरलूमची एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती आलेत. त्यामुळे लॉक डाऊनच्या मूळ उद्धेशालाच पॉवरलूम चालकांनी हरताळ पासल्याचं दिसतंय. आता नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या पॉवरलूम चालकांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

अशा प्रकारे महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलंय. सर्व सामान्यांसह प्रत्येकजण या कोरोनाशी लढतोय. आता त्याचा निपटारा कधी होईल आणि कधी पुर्वीसारखं आयुष्य होईल हीच प्रतिक्षा सर्व जण करतायत.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com