आता सफाई कामगारांना हक्काचे घर 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

 

 

मुंबई: पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील हजारो सफाई कामगार मुंबईत दिवसरात्र स्वच्छतेचे काम करतात. या कामगारांना कुटुंबासह राहण्यासाठी 'भाडेरहित सेवा निवासस्थानांचे' वाटप करण्यात येते. या निवासस्थानांमध्ये सफाई कामगार वारसाहक्काने पिढ्यानपिढ्या राहत आहेत. पालिकेच्या ८ नोव्हेंबर १९७१ च्या परिपत्रकानुसार बीआयटी चाळीमध्ये 'भाडेरहित' घरात राहणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामधील चतुर्थश्रेणी कामगारांची घरे 'प्रमाणित भाडे पद्धतीत' परावर्तित करण्यात आली आहेत. तर मुंबईत २००० पूर्वीपासून राहणाऱ्या रहिवाशांना पुनर्विकास योजनेत पक्की घरे मोफत व मालकी तत्त्वावर देण्यात येतात. मात्र घनकचरा व्यवस्थापन खात्यातील जुने पलटण रोड येथील वसाहतीमधील कामगारांना १९४६ पासून राहत असताना ही घरे प्रमाणित भाडेपद्धतीने परावर्तित करण्यात आलेली नाहीत.

स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांना आता मुंबईतच हक्काचे घर मिळणार आहे. महापालिकेच्या वसाहतीमध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या नावे सध्या ते राहत असलेली घरे 'प्रमाणित भाडेपद्धतीने' देण्याचा निर्णय बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. पालिका आयुक्तांनी या निर्णयाला मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर या सफाई कामगारांसाठी १ एप्रिल १९४६ च्या वास्तव्याची अट शिथील करून ती १ एप्रिल १९८५ करण्यात यावी व १ एप्रिल १९८५ पूर्वीपासून पालिका वसाहतीमधील एकाच सदनिकामध्ये वारसा हक्काने पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्या सफाई कामगारांच्या नावे त्या सदनिका प्रमाणित भाडे पद्धतीने परावर्तित करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली होती. यासाठी त्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र दिले होते. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानंतर आयुक्त प्रवीण परदेशी याांनी मान्यता देत पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

 

Web Title Now a home for cleaning workers


संबंधित बातम्या

Saam TV Live