कोरोनाच्या संकटात आता महागाईचा तेरावा महिना, साठेबाजांच्या नफेखोरीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री

साम टीव्ही
रविवार, 11 ऑक्टोबर 2020
  • तेल, डाळींच्या दरवाढीने बजेट भरडलं
  • कोरोनाच्या संकटात आता महागाईचा तेरावा महिना
  • साठेबाजांच्या नफेखोरीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री

बातमी तुमच्या आमच्या कामाची. महाराष्ट्रातील ग्राहक महागाईमुळे होरपळून निघालेयत. कारण भाज्यांपाठोपाठ आता डाळी आणि तेलही प्रचंड महागलंय. आधीच कोरोनाचं संकट आणि त्यात या महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागलीय.

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. त्यातच आता तेल आणि डाळींचे दरही कमालीचे वाढलेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट अक्षरश: भरडून निघालंय. अवघ्या 25 दिवसांत तेल आणि कडधान्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत.

 

डाळींच्या दरांनी बडेट भरडलं
तूरडाळ १२८ ते १३०, तर उडीदडाळ ११५ ते ११८ रुपये किलो विकली जात आहे.
डाळींसह तेलाचे दरही ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत असल्याचं दिसून येतंय.

तेल महागाईच्या कढईत
सूर्यफूल तेलाचे दर 120 ते 130 रुपयांवर पोहचले असतानाच सोयाबीन तेलाचे दरही 110 ते 120 रुपयांवर गेले आहेत. त्याचप्रमाणे शेंगतेल 140 ते 150 रुपयांवर पोहोचलेत. आणि पामतेलाचे दरही आता 90 ते 110 रुपयांवर गेलेत, तर इकडे रोज लागणाऱ्या भाज्यांचे दरही प्रचंड वाढल्याने गृहिनींना तारेवरची कसरत करावी लागतेय. 
 
भाज्यांचे दर गगनाला भिडले
बाजारात वाटाणा 120 रु किलो, तर कोबी 50 रुपये किलोवर पोहोचलाय. त्याचप्रमाणे वांगी 50 रु किलो तर, फ्लॉवर 60 रुपये किलोने बाजारात मिळतोय. कोथिंबीरीची जुडी 25 रुपयांना मिळू लागलीय. त्याचप्रमाणे भेंडी 30 रुपये किलो आणि गवारीचे दर प्रतिकिलो 80 रुपये झालेयत.

खरंतर, लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग ठप्प असताना शेतीक्षेत्र मात्र मोठ्या जोमाने सुरू होतं. मात्र परतीच्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं आणि डाळी, भाज्यांचे दर वाढले. मात्र असं असलं तरी, काही व्यापाऱ्यांची साठेबाजीही या दरवाढीला कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त होतोय. त्यामुळे सरकारने या साठेबाजांना वेळीच अद्दल घडवून ग्राहकांना आणि शेतकऱ्यांनाही दिलासा द्यायला हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live