सचिन वाझेंवरून विरोधक विधानभवनात आक्रमक

साम टीव्ही
बुधवार, 10 मार्च 2021

मनसुख हिरेन यांचं काय झालं?
सचिन वाझेंचं पुढे काय होणार?
हिरेन मृत्यू प्रकरणाचा त्रिकोण कसा भेदणार ? 

अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या कारचं प्रकरण, मनसुख हिरेन, धनंजय गावडेंवरून आता सचिन वाझेंपर्यंत पोहोचलंय. सचिन वाझे यांची चौकशी करण्याची मागणी हिरेन यांच्या पत्नीनेच केलीय. त्यामुळे, विरोधक सचिन वाझेंवरून विधानभवनात आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांची कार.  त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू. आणि या सगळ्या रहस्यमय घटनाक्रमात आता सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे सचिन वाझे. पोलिस अधिकारी सचिन वाझेंवरून राजकारणही चांगलंच तापलंय. विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्येही सचिन वाझेंवरून जोरदार खडाजंगी झालीय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर हिरेन यांच्या पत्नीचा जबाबच सभागृहात वाचून दाखवलाय.

व्यवसायाच्या निमित्तानं, ग्राहक असलेले सचिन वाझे, हे माझ्या पतीच्या ओळखीचे होते. त्यांना माझ्या पतीनं नोव्हेंबर २०२० मध्ये स्कॉर्पिओ कार वापरण्यासाठी दिली होती. तब्बल चार महिने  ही कार सचिन वाझेंकडे होती..  माझ्या पतीच्या नोंद केलेल्या जबाबाच्या कॉपीवर सचिन वाझेंची सही आहे. याचा अर्थ मनसुख हिरेन यांची चौकशी वाझेंनीच केली, इतर कुणीही केलेली नाही, असंही जबाबात सांगण्यात आलंय. तसंच सचिन वाझेंनी ''तू या केसमध्ये अटक हो,  दोन-तीन दिवसात मी तुला जामिनावर काढतो'' असं माझ्या पतीला सांगितलं होतं. या एकंदर परिस्थितीवरुन माझ्या पतीचा खून झाला असावा, अशी माझी खात्री आहे. आणि हा खून सचिन वाझे यांनी केला असावा, असा माझा संशय आहे. म्हणून या घटनेबाबत सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती आहे. 
 

देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंवरून आक्रमक पवित्रा घेतल्यावर, शिवसेना नेते अनिल परब यांनीही खासदार डेलकर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय.

महत्त्वाचं म्हणजे, गेली काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सीडीआरचा उल्लेख करत, सचिन वाझे यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यालाही उत्तर देताना सीडीआर काढण्याचा अधिकार विरोधी पक्षनेत्यांना आहे का असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय.

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूवरून पोलिस यंत्रणा खडबडून जागी झालीय. त्यातच, सचिन वाझे यांच्याकडे संशयाची सुई वळलीय. त्यामुळे, मनसुख हिरेन यांचं नेमकं झालं काय आणि सचिन वाझेंचं पुढे काय होणार... याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागलेयत.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live