वारकऱ्यांचा श्वास असणारी, त्यांच्या जगण्याला बळ देणारी वारी यंदा कशी असेल वाचा...

विशाल सवने
शुक्रवार, 8 मे 2020

वारकऱ्यांचा श्वास म्हणजे वारी... जगण्याचा ध्यास म्हणजे वारी... महाराष्ट्राच्या संस्कृतीचं संचित असलेल्या वारीवर यंदा कोरोनाचं सावट आहे... जगण्याला बळ देणाऱी वारी यंदा कशी असेल? याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत

वारकऱ्यांचा श्वास म्हणजे वारी... जगण्याचा ध्यास म्हणजे वारी... महाराष्ट्राच्या संस्कृतीचं संचित असलेल्या वारीवर यंदा कोरोनाचं सावट आहे... जगण्याला बळ देणाऱी वारी यंदा कशी असेल? याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत

भर उन्हात तापत पडलेल्या रानाची तगमग-तगमग होत असते. अन् अचानक घोंघावणारा वारा सुटतो. पालापाचोळा भिरभिरत आभाळाकडे धावतो. निळ्याशार आभाळातले ढग हातात हात घालून एक होतात...पांढरे ढग क्षणार्धात सावळे होऊन जातात... अन् तेवढ्यात शेता-वावराच्या अंगावर टपोरे थेंब पडतात. ढेकळांचं लोणी होऊन शेतातल्या पाटातून वाहू लागतं.... सगळ शिवार झडझडून चिंब होऊन जात असतानाच कुठूनसा आवाज येत राहतो... टाळ मृदुंगाचा... झाडांच्या फांद्या ठेका धरतात... पानं ताल धरतात... चिंब झालेलं शिवार अभंगाच्या लयीत डोलू लागतं... माऊली आली... वारी आली... माझे जीवाची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।।चा जयघोष होतो... पावलं झपाझप पंढरपूरकडे कूच करत राहतात... पंढरीची वारी आहे माझ्या घरी म्हणत वारकरी दरवर्षी न चुकता पंढरीचा वाट धरतात नित्यनेमाने... यंदा मात्र आक्रीत घडलंय... कोरोनाचा फेरा फिरलाय... पिढ्यानपिढ्यांचा वारसा सांगणाऱ्या वारीला यंदा खंड पडतोय की काय असं झालंय... भेटीसाठी आसुसलेला वारकरी कासावीस झालाय अन् तिकडं विठ्ठलही... याआधी संकटं आली नाहीत असं नाही, खूपदा संकटं आली पण वारी काही चुकली नाही.
संकटातही वारीची पताका कशी फडकली?
सन 1865 साली राज्यात कॉलराची साथ आली तेव्हा पंढरपूर रिकामं केलं गेलं. मात्र पंढरीची वारी चुकली नाही. त्यानंतर 1898 आणि 1956 साली पंढरपुरात महापूर आला होता. संपूर्ण पंढरपूर पाण्याने वेढलं होतं. तेव्हाही संतांच्या पालख्या वाखरीत थांबवून होडीतून फक्त पादुका विठूरायाच्या भेटीला नेण्यात आल्या होत्या. नंतर 1918 आणि 1946 साली प्लेगची साथ आली तेव्हाही फक्त पादुका विठोबाच्या भेटीला नेण्यात आल्या होत्या.
वारी कधी सुरू झाली त्याचा पुरावा सापडत नसला तरी साध्याभोळ्या वारकऱ्यानं वारी कधी चुकवली नाही... यंदा मात्र वारीवर कोरोनाचे ढग जमा झालेत. पण मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे म्हणणारा वारकरी डगमगणार नाहीय. यंदाही ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, नाथ महाराज, चोखोबांसारखे संत विठ्ठलाच्या चरणी लीन होतीलच. पण यंदा पालख्यांसोबत केवळ दहाच वारकरी जाणारेत... दरवर्षी लाखोंच्या संख्येनं सहभागी होणारी वारकऱ्यांची मांदियाळी यंदा पालख्यांसोबत नसेल. पण म्हणून वारकरी खचणार नाही.... कारण चंद्रभागेतिरी उभ्या असलेल्या त्या सावळ्या विठ्ठलाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर कायमच असणारय... आपण कुठेही असो... वारीत असो की घरी... राम कृष्ण हरी.


संबंधित बातम्या

Saam TV Live