तुर्तास पेट्रोल, डिझेलची दरवाढ होणार नाही, कारण...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मे 2020

उत्पादन शुल्कात जरी वाढ झाली असली तरी पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी पुण्यात सांगितले

: पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर अनुक्रमे 10 रुपये आणि 13 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी रात्री उशीरा घेतला.मात्र, या वाढीचा किरकोळ दरांवर परिणाम होणार नसल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लॉक डाउनच्या काळात पेट्रोल, डिझेल मिळत नसले तरी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

कोरोनामुळे वाहतूक सध्या बंद आहे. 25 मार्चपासून नागरिकांची वाहने जागेवरच आहेत. 17 मे नंतर लॉक डाउन उठल्यास नागरिकांची वाहने रस्त्यावर येऊ शकतात. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण झाली आहे. यामुळे तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणे अपेक्षित होते. परंतु सरकारने उत्पादन शुल्कात वाढ केल्याने तेल कंपन्यांकडून दरात कपात झाली नाही.

तेल कंपन्या जागतिक  दरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव गेल्या महिन्यात प्रती बॅरल 18.6 डॉलर ठरला होता. ही भावातील 1999 नंतरची निच्चांकी पातळी होती. कोरोनामुळे  अनेक देशांमध्ये लॉक डाउन असल्याने खनिज तेलाची मागणी सध्या कमी झाली आहे.  सध्या खनिज तेलाचा भाव प्रति बॅरल 28 डॉलर आहे.

उत्पादन शुल्कात जरी वाढ झाली असली तरी पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी पुण्यात सांगितले.  पुण्यामध्ये पेट्रोलचा दर 70.3 प्रती तर डिझेलचा 64. 98 प्रती लिटर राहणार आहे. राज्य सरकारने 1 एप्रिल रोजी व्हॅटमध्ये  वाढ केली होती.  त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लिटर 1 रुपयाने वाढ झाली होती.  उत्पादन शुल्कात वाढ होऊनही पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल पंपाची वेळ दहा ते दुपारी दोन अशी ठेवायची का त्यामध्ये वाढ करायची, याचा निर्णय आज दिवसभरामध्ये होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता या बाबत दुपारी बैठक होणार असून त्यामध्ये वेळ वाढविण्याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये  पेट्रोल आणि डिझेल सर्वसामान्य नागरिकांना तूर्त मिळणार नसल्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी बुधवारी सकाळी स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आणि संबंधितांना सध्या पेट्रोल दिले जाणार आहे. सर्वसामान्यांनाही पेट्रोल मिळणार असल्याचे वृत्त म्हणजे अफवा असल्याचे जिल्हा प्रशासनाने, पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live