पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली: अरामकोवर झालेल्या हल्ल्यानंतर पेट्रोल व डिझेलदरात दररोज भर पडत आहे. इंधनदरांत १७ सप्टेंबरपासून सलग सहा दिवस वाढ झाली आहे. रविवारी देशभरात पेट्रोलचे दर २७ पैशांनी तर डिझेलचे दर १८ पैशांनी वाढवण्यात आले. यामुळे मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर आता ७९.२९ रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईतील डिझेलदराने प्रतिलिटर ७०.०१ रुपयांची नोंद केली. नवी दिल्लीमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे ७३.६२ व ६६.७४ रुपये नोंदवण्यात आले.

सौदी अरेबियातील अरामको या सर्वांत मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर १४ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याची झळ भारतातील इंधनदरांना बसण्यास सुरुवात झाली आहे. पाच जुलैनंतर अनेक दिवस स्थिर असणारे पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील पेट्रोलदर प्रतिलिटर ८० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात एकूण सहा दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे १.५९ व १.३१ रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या इंधनाचे दर चढे राहिल्यास येत्या काळात आणखी दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.

भारताच्या एकूण इंधनगरजेपैकी ८३ टक्के गरज ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. यातही सौदी अरेबिया हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा इंधन पुरवठादार देश आहे. सौदीकडून भारताला दरमहा २० लाख टन इंधनाचा तसेच, दोन लाख टन एलपीजीचा पुरवठा केला जातो. चालू महिन्यात भारताने आतापर्यंत १२ ते १३ लाख टन इंधनाची आयात झाली असून उर्वरित आयातही विनाअडथळा केली जाईल, अशी हमी सौदीने दिली आहे.

ड्रोनहल्ल्यामुळे अरामकोमधून होणाऱ्या इंधन उत्पादनावर कमालीचा परिणाम झाला आहे. या हल्ल्यानंतर अरामकोचे दैनंदिन इंधन उत्पादन ५७ लाख बॅरलने घटले आहे. या प्रकल्पाच्या एकूण दैनंदिन क्षमतेच्या प्रमाणात ही घट तब्बल ६० टक्के आहे. जागतिक बाजारात सौदीकडून होणाऱ्या इंधन पुरवठ्याचे प्रमाण पाच टक्के असल्याने अरामकोमध्ये निर्माण झालेली घट ही केवळ मध्यपूर्वेतील इंधन बाजारांसाठी नव्हे तर, एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी परिणामकारक ठरली आहे. कमी पुरवठ्यामुळे कच्च्या इंधनाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. ब्रेण्ट क्रूड ऑइलचे दर सध्या प्रतिबॅरल ६५ अमेरिकी डॉलरच्या आसपास आहेत. सौदीकडून होणारा पुरवठा सुरळीत होईलपर्यंत हे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
Web Tittle : Petrol reaches 80 in Mumbai


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com