छत्रपती संभाजी राजेंना तिसऱ्या रांगेत स्थान दिल्यावरुन रंगल मानापमान नाट्य

साम टीव्ही
गुरुवार, 9 जुलै 2020
  • सारथी संस्थेच्या बैठकीत मानापमान नाट्य 
  • छत्रपती संभाजी राजेंना तिसऱ्या रांगेत स्थान
  • मराठा समाजाच्या समन्वयकांचा आक्षेप 

सारथी संस्थेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली. पण याच बैठकीत मोठा गोंधळ झाला. छत्रपती संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान दिल्यावरून बैठकीत जोरदार खडाजंगी झाली.

सारथी संस्थेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीच्या सुरुवातीलाच प्रचंड गोंधळ झाला. त्याला निमित्त झालं ते खासदार छत्रपती संभाजीराजेंना देण्यात आलेलं तिसऱ्या रांगेतलं स्थान. छत्रपती संभाजी राजेंना मागच्या रांगेत बसल्याचं पाहताच मराठा समाजाच्या समन्वयकांनी जोरदार आक्षेप घेतला. यावरून मोठा गोंधळ झाला. 

मात्र, संभाजीराजेंनी सामंजस्याची भूमिका घेत परिस्थिती शांतपणे हाताळली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मध्यस्थी करत बैठकीतला गोंधळ मिटवला. या गोंधळानंतर सभागृहात बैठक न घेता अजित पवार यांच्या दालनात स्वतंत्र बैठक घेण्यात आली. आपण इथे समाजाचे सदस्य म्हणून आलो आहोत, असं सांगत संभाजीराजेंनी मराठा समन्वयकांची समजूत काढली. 

तर असे निरर्थक वाद न करता मराठा समाजाच्या विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य द्या, अशा सूचना अजित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या. 

सारथी संस्थेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच अनेक राजकीय नेते या संस्थेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. आता सारथी संस्थेशी निगडीत मतमतांतराच्या नाट्यामध्ये या गोंधळामुळे आता आणखी एक वाद जोडला गेलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live