पुण्यात मेट्रोच्या डेपोंचे काम वेगात सुरू

पुण्यात मेट्रोच्या डेपोंचे काम वेगात सुरू

पुणे - वनाज-रामवाडी मेट्रो मार्गाचे उद्‌घाटन पुढील वर्षी जानेवारीमध्ये करायचे असल्यामुळे त्यासाठीच्या देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी लागणाऱ्या डेपोच्या उभारणीने कोथरूडमध्ये वेग घेतला आहे. तर, कृषी महाविद्यालयाजवळील रेंजहिल्स डेपोचेही काम जोरात सुरू आहे. तेथून दोन महिन्यांत भुयारी मेट्रोचे काम सुरू होणार आहे.

मेट्रो प्रकल्पासाठी डेपो अत्यावश्‍यक असतो. मेट्रोच्या सर्व गाड्यांची दररोज रात्री देखभाल- दुरुस्ती केली जाते, त्यासाठी शहरात कोथरूड आणि रेंजहिल्समध्ये डेपो उभारण्याचे काम सुरू आहे. दोन्ही ठिकाणी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २० गाड्यांच्या देखभाल- दुरुस्तीचे काम होणार आहे, तसेच तेथे वर्कशॉप्स असतील. रेल्वे गाड्या धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेचाही त्यात समावेश असेल. डेपोच्या जागा ताब्यात आल्यावर जानेवारीमध्ये दोन्ही ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. वनाज- रामवाडी मार्गावरील मेट्रोचे पुढील वर्षी २६ जानेवारी दरम्यान उद्‌घाटन होणार आहे, त्यासाठी कोथरूड डेपोत पहिला टप्पा कार्यान्वित करण्यासाठी सध्या वेगाने काम सुरू आहे, तर रेंजहिल्स डेपोमध्ये काम जोरात सुरू असल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. मेट्रोचे नवे कोच आल्यावर त्याची चाचणी घेण्यासाठी दोन्ही डेपोंमध्ये ट्रॅक उभारण्यात येत आहे. आगामी किमान ४० वर्षांचा विचार करून दोन्ही डेपोंचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात मार्गांची आणि त्यानुसार रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यावरही डेपोंच्या विस्तारासाठी वाव असेल, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे यांनी सांगितले. 

पिंपरी- स्वारगेट मेट्रो मार्गावर एलिव्हेटेड मेट्रोचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे, तर भुयारी मेट्रो रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान असेल, त्यासाठी बोगदा खोदायचे काम नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. रेंजहिल्स डेपोजवळ त्यासाठीची तयारी सध्या सुरू आहे.  

कमर्शिअल डेव्हलपमेंट
कोथरूड डेपोमध्ये काही भाग दुमजली असेल. खालच्या बाजूला मेट्रोचा डेपो, तर वरच्या बाजूला व्यावसायिक संकुल, असे त्याचे स्वरूप असेल. याच धर्तीवर रेंजहिल्स डेपोमध्येही व्यावसायिक संकुल असेल, त्यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारीवर (पीपीपी) विकसन करण्यात येणार आहे. डेपो उभारणीचे काम पूर्ण झाल्यावरही व्यावसायिक वापराचे संकुल उभारता येणार आहे. त्यासाठी पुरेशी जागा, प्रवेशासाठी रस्ता, पार्किंग आदी सुविधा उपलब्ध असतील, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. मेट्रोसाठी प्रवासी भाड्यातून आकारण्यात येणाऱ्या रकमेतून ५० टक्के उत्पन्न मिळणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम कमर्शिअल डेव्हलपमेंटमधून उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकते, असेही महामेट्रोने स्पष्ट केले.

Web Title: Pune Metro Depo Work

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com