पुणे विद्यापीठ उभी करणार कोल्हापुर अन् सांगलीतील दहा गावे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पुणे : पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांतील जनजीवन उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभरातून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही आपला वाटा उचलणार आहे. या दोन जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच अशा दहा गावांची उभारणी करण्यासाठी विद्यापीठ मदत करणार आहे. प्रत्येक गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या दोनशे विद्यार्थी योगदान देणार आहेत. 

पुणे : पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांतील जनजीवन उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभरातून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही आपला वाटा उचलणार आहे. या दोन जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच अशा दहा गावांची उभारणी करण्यासाठी विद्यापीठ मदत करणार आहे. प्रत्येक गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या दोनशे विद्यार्थी योगदान देणार आहेत. 

राज्यातील नागरिकांनी मदतीच्या रुपाने आपला सहभाग पूरग्रस्तांसाठी दिला आहे. पण या जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली. शेती, जनावरे आणि अनेकांचे संसार, तसेच व्यवसाय बुडाले. या लोकांना खरी गरज मानसिक आधार आणि नव्याने उभारी घेण्यासाठी आवश्‍यक मदतीची आहे. हे ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दहा गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी राज्य सरकारने काही योजना आणि मदत जाहीर केली आहे. सरकारी यंत्रणेचे मार्गदर्शन घेऊनच विद्यापीठ पाच गावे दत्तक घेणार असून, या गावांची पुन्हा उभारणी केली जाणार आहे. 

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे याबाबत म्हणाले, "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दहा गावे दत्तक घेण्यास मंजुरी दिली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली असून, दहा गावे निश्‍चित करून देण्याची विनंती त्यांना केली आहे. तसेच शिक्षण संस्थाचालक, प्राध्यापक, प्राचार्य संघटना, कर्मचारी संघटनांशी चर्चा सुरू आहे. या प्रत्येकाने मदतीसाठी किमान शंभर रुपये योगदान द्यायचे आहे. त्यासाठी परिपत्रक जारी करीत आहोत. ही रक्कम बॅंक खात्यात जमा होईल. त्यातून पूरग्रस्त भागातील शैक्षणिक मदत आणि महाविद्यालयांना वस्तू रुपात मदत केली जाणार आहे. 

राजेश पांडे म्हणाले, "पुरामुळे गावांमध्ये रोगराई पसरण्याची भिती आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून गावे निश्‍चित करून घेतली जातील. त्या प्रत्येक गावामध्ये दोनशे मुलांचे शिबीर होईल. हे विद्यार्थी प्रत्येक घरामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांचा घरसंसार उभा करण्यात योगदान देतील. यासाठी एक हजार विद्यार्थ्यांचे दोन गट तयार केले जातील. प्रत्येक गट तीन दिवस गावांच्या उभारणीसाठी योगदान देईल.'' 


संबंधित बातम्या

Saam TV Live