VIDEO | खाकी वर्दीतल्या या हीरोला साम टीव्हीचा कडक सॅल्यूट..

साम टीव्ही
गुरुवार, 30 एप्रिल 2020

कोरोनाशी कुणी घरात बसून लढतंय, तर घरात बसलेल्यांच्या जीवासाठी कुणी रस्त्यावर निकराचा लढा देतंय. स्वत:च्या वेदना विसरून, जगाच्या सुखासाठी लढणाऱ्या साम हीरोंना आम्ही सलाम करतोय.

कोरोनाशी कुणी घरात बसून लढतंय, तर घरात बसलेल्यांच्या जीवासाठी कुणी रस्त्यावर निकराचा लढा देतंय. स्वत:च्या वेदना विसरून, जगाच्या सुखासाठी लढणाऱ्या साम हीरोंना आम्ही सलाम करतोय. पाहूयात मालेगावच्या राजेंद्र सोनवणेंची चित्तरकथा खालील व्हिडीओत...

मालेगावात रखरखीत उन्हात पहारा देणारे हे आहेत राजेंद्र सोनवणे... लॉकडाऊनच्या काळात सगळेच पोलिस बांधव रस्त्यावर पाहारा देतायत असं तुम्ही म्हणाल, पण मंडळी, तुमच्या-आमच्या जीवासाठी राजेंद्र सोनवणे हाती प्राण घेऊन रस्त्यावर खंबीरपणे उभेयत. कारण 4 वर्षांपूर्वी राजेंद्र सोनवणेंची एक किडणी फेल झालीय आणि दुसरी किडणीही केवळ 35 टक्के काम करतीय.

मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये जमादार पदावर कार्यरत असणाऱ्या राजेंद्र सोनवणेंना आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतंय, मात्र हे सर्व करत राजेंद्र सोनवणे कोरोनाच्या लढ्यात मोठ्या हिमतीने उतरलेयत. वरिष्ठांचं सहकार्य आणि कुटुंबाचं पाठबळ असल्यानेच मला हे शक्य होत असल्याचं सांगताना राजेंद्र सोनवणेंच्या डोळ्यांत जबरदस्त आत्मविश्वास दिसतो.

कोरोनाच्या संकटाशी कुणी घरात बसून लढतंय तर घरात बसलेल्या प्रत्येकासाठी कुणी रस्त्यावर लढतंय. हे संकट जगावरचं आहे, त्यामुळे यात लढणारा प्रत्येकजण लढवय्या आहे. या संकटाच्या मानगुटीवर बसून आपण नक्की विजयी होऊ... त्यामुळे हे संकट संपेल तेव्हा प्राण तळहाती घेऊन लढलेला प्रत्येकजण जगज्जेता असणारेय... म्हणूनच मालेगावचे राजेंद्र सोनवणे या सर्व लढवय्यांचे शिलेदार आहेत... ते खरे हीरो आहेत... खाकी वर्दीतल्या या हीरोला साम टीव्हीचा कडक सॅल्यूट.


संबंधित बातम्या

Saam TV Live