#CoronaEffect आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार सुरु - राजेश टोपे

साम टीव्ही न्यूज
रविवार, 8 मार्च 2020

कोरोनाचा फटका आयपीएल सामन्याला बसण्याची शक्यता 

आयपीएलची स्पर्धा पुढे ढकल्याचा विचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.

नागपूर : करोनामुळे घाबरण्याची गरज नाही. सरकारतर्फे खबरदारीसुद्धा घेतली आहे. मात्र त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीत जाणे टाळणे आवश्‍यक आहे. याच कारणामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आयपीएल स्पर्धेत देश-विदेशातील खेळाडूंचा सहभाग असतो. देशातील सर्वच प्रमुख राज्यांमध्ये सामने बघण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होते. संभाव्य धोका टाळण्यासाठी सामने रद्द करणे आवश्‍यक आहे. गर्दीच्या कार्यक्रमांना टाळावे असे सरकारतर्फे आवाहन करण्यात आले. त्यामुळे आयपीएल सामनेही रद्द करण्याचा विचार सुरू आहे. याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियमाक मंडळासोबत चर्चा करून घेतला जाईल. राज्य स्तरावरील अनेक स्पधा व कार्यक्रम रद्द करण्यात आल्या आहेत, असेही नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी सांगितले.

नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशी फ्लाईट मधून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सर्व शासकीय रुग्णालयात कोरोना संदर्भात वॉर्ड आणि डॉक्‍टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस संदर्भात आशा वर्कर्सना ११ ते १३ मार्च दरम्यान ट्रेनिंग दिले जाणार आहे. हे सर्व खबरदारीचे उपाय आहेत. त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. सरसकट सर्वांना मास्कची गरज नाही. त्यामुळे मास्कची साठवणूक करू नका, असे आवाहन टोपे यांनी केले. 

कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहे. शाळा बंद करण्यात आल्या, काही शासकीय कार्यालयात बायोमेट्रोक पद्धती बंद करण्यात आली हे वृत्त चुकीचे आहे. सरकारतर्फे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा एवढेच आवाहन करण्यात आले. याकरिता काही राज्यस्तरीय स्पर्धा आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनासुद्धा तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरडी होळी खेळा

होळीच्या पिचकाऱ्या, रंग तसेच अनेक साहित्य चीन मधून आयात होते. सध्या करोनाचा धोका लक्षात घेता शक्‍यतोवर रंगाची तसेच पाण्याची होळी खेळणे टाळावे. कोरडी होळी खेळावी, असेही आवाहनही टोपे यांनी केले.

WEB TITLE- Rajesh tope statement on corona


संबंधित बातम्या

Saam TV Live