रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील चुरस वाढली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील चुरस वाढली आहे. भाजपने सुरेश प्रभूंना पुढे केल्याने चौरंगी लढतीची शक्‍यता निर्माण झाली आहे. सेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, भाजपकडून केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नीलेश राणे यांची नावे चर्चेत आहेत. 

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील चुरस वाढली आहे. भाजपने सुरेश प्रभूंना पुढे केल्याने चौरंगी लढतीची शक्‍यता निर्माण झाली आहे. सेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, भाजपकडून केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नीलेश राणे यांची नावे चर्चेत आहेत. 

युती झाली नाही, तर हे चित्र असणार आहे. त्यासाठी सेना-भाजप दोन्ही पक्षांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरीतील तीन व सिंधुदुर्गातील तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी ५ मतदारसंघ शिवसेनेकडे, तर १ काँग्रेसकडे आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत आणि काँग्रेसचे नीलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली. खासदार राऊत दीड़ लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍याने निवडून आले होते; पण त्यावेळी शिवसेना-भाजप युती होती. आता युती होण्याची शक्‍यता धुसर आहे. सुरेश प्रभूंना उमेदवारी दिली, तर सेनेला ते अडचणीचे ठरू शकते.  

प्रभू यांना व्यक्तिगत मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे जोरदार टक्कर होणार हे नक्की. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याअनुषंगाने पेरणी करायला सुरवात केली आहे. भाजपने सुरेश प्रभूंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. या लोकसभा मतदारसंघात दीड लाखाच्या आसपास भाजपची मते आहेत. काँग्रेसचे बांदिवडेकर उभे राहिले, तर काँग्रेसची पारंपरिक मते त्यांच्या पारड्यात पडणार.

स्वाभिमाननेही चांगले पाय पसरले आहेत. युती झाली नाही तर शिवसेनेला निर्णायक मतांसाठी कसरत करावी लागणार आहे. त्यापेक्षा युती सेनेच्या पथ्थ्यावर पडणार आहे. अंदाजे ९ ते १० लाखांच्या आसपास मतदान होईल. स्वाभिमानकडून नीलेश राणेंसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याने चुरशीत भर पडणार आहे.

सेनेला नक्की अडचणीचे 
दोन्ही जिल्ह्यांत सेनेची मोठी ताकद आहे. सेनेला धक्का देण्यासाठी किंवा वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपचे संभाव्य उमेदवार सुरेश प्रभू यांना रसद पुरविण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास सेनेला नक्की अडचणीचे ठरणार आहे.

Web Title: Ratnagiri Sindhudurg Loksabha constituency


संबंधित बातम्या

Saam TV Live