वाचा |उद्या मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता

वाचा |उद्या मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता

मुंबई :मुंबईमध्ये रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारीही आकाश ढगाळ राहील. तर मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार ३ जून रोजी मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही वाढलेला असेल. ३ आणि ४ जून या दिवशी मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला आहे. तर सध्या समुद्रात असलेल्या मच्छिमारांनी किनाऱ्याकडे परतावे अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. २ ते ३ जून या काळात दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ६५ ते ८५ किलोमीटर प्रती तास असा वाऱ्याचा वेग असेल. हा वेग वाढून ३ जून रोजी सकाळी महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ ९० ते ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या संदर्भातील इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.सोमवारी दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २ आणि ३ जून रोजी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ आणि ४ जून रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज आहे. मात्र काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.


प्रादेशिक हवामान विभागाने नोंदवलेल्या पूर्वानुमानानुसार पालघरसाठी ३ आणि ४ जून रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड येथे या दोन दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात सोमवार आणि मंगळवार म्हणजे १ आणि २ जून रोजी तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार येथे सोमवार आणि मंगळवारी गडगडाट आणि वीजांचा अनुभव येऊ शकतो. तर गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. नाशिक, अहमनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये सोमवार ते बुधवार या काळात गडगडाट, जोरदार वारे तसेच विजांचा अंदाज आहे. बुधवारी आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो. तर सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह गडगडाट, विजा आणि जोरदार वारे वाहू शकतात. बुधवारी गडगडाटासह या सर्व ठिकाणी पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, जालनामध्ये मंगळवारपासून गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मात्र सोमवारी यासोबतच जोरदार वाऱ्यांचीही शक्यता आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र २४ तासांमध्ये अधिक तीव्र स्वरूपाचे होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील २४ तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. या चक्रीवादळाचे बांग्लादेशने सुचविल्यानुसार निसर्ग असे नामकरण करण्यात येईल. निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीजवळून जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टीजवळील भागामध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. तसेच, वाऱ्यांचा जोरही अधिक असेल.अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. 'निसर्ग' असे नामकरण होणारे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. परिणामी किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईमध्येही मंगळवारपासून पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com