राज ठाकरे म्हणताहेत.....घुसखोरांना बाहेर काढणे हे कर्तव्य

सरकारनामा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020


भारतामध्ये घुसलेले जे घुसखोर आहेत, त्यांना बाहेर काढणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूर येथे व्यक्त केले

लातूर : भारतामध्ये घुसलेले जे घुसखोर आहेत, त्यांना बाहेर काढणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केले. घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी मुंबईत येत्या रविवारी (ता. ९) आपण मोर्चा आयोजित केला आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १) झाला. पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मुंबईबाहेर प्रथमच त्यांचा जाहीर कार्यक्रम लातूरात झाला. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या भागात भगव्या रंगाच्या कमानी त्यांच्या स्वागतासाठी उभ्या करण्यात आल्या होत्या. रंगमंच ही भगव्या रंगांचा उभारण्यात आला होता. शिवाय, राज ठाकरे यांना सत्कारावेळी देण्यात आलेली शालही भगव्या रंगाचीच होती. त्यामुळे प्रदर्शनस्थळी भगवेमय वातावरण झाले होते. राज ठाकरे यांचे अशा पद्धतीने स्वागतही प्रथमच होत होते. याच वेळी त्यांनी नागरिकांना मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही केले.

राज ठाकरे हे आपल्या भाषणाची सुरवात ‘इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता ,बंधु आणि भगिनींनो’ अशा शब्दांत करतात का? याकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. पण त्यांनी ‘इथे जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो’ अशा शब्दांत केली. त्यानंतर ते म्हणाले, शेती विषयाचे ज्ञान मी शेतकऱ्यांना पाजळू शकत नाही. कारण महाराष्ट्रातील शेतकरी आधीपासूनच प्रयोगशील आहे. महाराष्ट्राबरोबरच पंजाब, हरियाणा येथेही प्रयोगशील शेतकरी पहायला मिळतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल. शेतकऱ्यांना आम्ही शेतीविषय सल्ला देणार नाही. पण, शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी उभे राहावे, असे आम्हाला वाटते. हे सांगण्यासाठीच मी लातूरात आलो आहे.

मनसे उभारणार ‘वनराई बंधारे’
या प्रदर्शनात ‘शेती दवाखाना’ आणि शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी ‘बळीराजा शिष्यवृत्ती योजना’ या उपक्रमाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार राजू पाटील, मनसेचे नेते अनिल शिदोरे, प्रकाश महाजन, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रदर्शनाचे आयोजक आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे याप्रसंगी उपस्थित होते. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी १ हजार वनराई बंधारे उभारण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. तो या वेळी जाहीर करण्यात आला.

भाषण आटोपले अवघ्या तीन मिनिटांत
मागील आठवड्यात राज ठाकरे हे मराठवाडा दौरा करणार होते. पण, आजारपणामुळे त्यांना मराठवाडा दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. मात्र, मुंबईत येत्या रविवारी (ता. ९) मोर्चा झाल्यानंतर पहिला दौरा मी मराठवाड्याचा करणार आहे, असे ठाकरे यांनी याप्रसंगी जाहीर केले. सर्दी आणि खोकला झाल्यामुळे त्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यातही अवघ्या तीन मिनिटांत आपले भाषण आटोपते घेतले. आजारपणामुळे मला आपणाशी जास्त संवाद साधता येणार नाही, अशी दिलगिरीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live