‘महा’ चक्रीवादळाचा धोका टळला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

पुणे परिसरात पावसाची शक्‍यता
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या; तर गुरुवारी मेघगर्जनेसह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ आणि बारामती परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

पुणे - सध्या ‘महा’ चक्रीवादळ अरबी समुद्रात पोरबंदर किनारपट्टीपासून काही अंतरावर असून, पुढील २४ तासांमध्ये त्याची तीव्रता कमी होईल. त्यामुळे पावसाचा जोर कमी होणार आहे; तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात ‘बुलबुल’ चक्रीवादळ तयार होत आहे; परंतु याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून पूर्व-मध्य अरबी समुद्रावर ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली होती; परंतु या अतितीव्र चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी (ता. ७ ) पहाटे चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होणार आहे. गेल्या २४ तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत गुरुवारी हलक्‍या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तसेच, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. पुढील २४ तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे. येत्या २४ तासांमध्ये हे कमी दाबाचे क्षेत्र ‘बुलबुल’ चक्रीवादळाचे रूप घेणार आहे. पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टीच्या दिशेने या चक्रीवादळाचा प्रवास असेल. या चक्रीवादळाचा प्रभाव अंदमान आणि निकोबार द्वीप, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या काही भागांवर पडेल.

 

Web Title: The risk of a hurricane was avoided


संबंधित बातम्या

Saam TV Live