लवकरच महामार्ग, द्रुतगतीवरील वेगमर्यादा कमी करण्यासाठी चाचपणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुणे - अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी महामार्गांवरील वाहनांच्या वेगाची मर्यादा कमी करता येईल का, याची चाचपणी महामार्ग पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान, महामार्गांवरील वाहतुकीचा कमाल वेग कमी करण्याची मागणी तज्ज्ञांकडूनही होत आहे.

पुणे - अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी महामार्गांवरील वाहनांच्या वेगाची मर्यादा कमी करता येईल का, याची चाचपणी महामार्ग पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान, महामार्गांवरील वाहतुकीचा कमाल वेग कमी करण्याची मागणी तज्ज्ञांकडूनही होत आहे.

महामार्ग, द्रुतगतीवरील वेगमर्यादा कमी करण्यासाठी चाचपणी
केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्रालयाने महामार्गांवरील वेगाची मर्यादा १ ऑगस्टपासून ताशी १२० किलोमीटर केली आहे. वेगाची मर्यादा वाढल्यामुळे वाहतूक भरधाव झाली असून, त्यातून प्रवाशांची असुरक्षितता वाढत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. द्रुतगती मार्गावर डॉ. केतन खुर्जेकर यांच्या अपघाताला कारणीभूत ठरलेली खासगी प्रवासी वाहतूक करणारी बसही ताशी १०० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावत होती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे भरधाव वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

केंद्र सरकारने वाहतुकीचा प्रतिताशी वेग वाढविण्याचा निर्णय घेतला, तरी राज्य सरकारला त्यांच्या अखत्यारीत परिस्थितीनुसार त्या निर्णयात बदल करता येतो. त्याबाबतचे अधिकार महामार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांना आहेत. त्यानुसार वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी महामार्ग पोलिस विभागाचे अतिरिक्त महासंचालक विनय कारगावकर यांनी विधी विभाग आणि राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) लेखी अभिप्राय मागविला आहे. त्यांच्याकडून अनुकूल अभिप्राय आला, तर राज्यातील सर्व द्रुतगती मार्ग तसेच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील वाहतुकीचा प्रतिताशी वेग कमी करता येऊ शकतो.

पेट्रोलिंग व्हेईकल्सचा भरधाव वाहनांवर वॉच
भरधाव वाहनांवर कारवाईसाठी राज्य पोलिसांनी ९६ पेट्रोलिंग व्हेईकल्स (मोठ्या मोटारी) विकत घेतल्या आहेत. त्या मोटारींमध्ये ब्रेथ ॲनालायझर, स्पीडगन, ई-चलनसाठीची स्वयंचलित यंत्रणा, दोरी, टॉर्च, स्टॅंड आदी विविध साधनांचा समावेश असेल, अशी माहिती महामार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. 

दंडाच्या धर्तीवर वेगाचा निर्णय
केंद्र सरकारने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. लोकसभा आणि राज्यसभेतही याबाबतचे विधेयक मंजूर झाले असून, त्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. मात्र, राज्य सरकारने आपल्या अधिकारात त्या निर्णयाला सध्या स्थगिती दिली आहे. त्याच धर्तीवर वेगमर्यादाही कमी करणे शक्‍य आहे, असे एका तज्ज्ञाने स्पष्ट केले.

द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’
द्रुतगती मार्गावरील ९४ किलोमीटवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) उभारण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने मंगळवारी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. त्यात विविध प्रकारचे सुमारे ३५० हून अधिक कॅमेरे असतील. द्रुतगती मार्गावर मध्यावर तिचा नियंत्रण कक्ष असेल.

महामार्ग, द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादेत वाढ करण्याचे कारण केंद्र सरकारने दिले नव्हते. राज्यात वाहनांची संख्या मोठी आहे. वेगमर्यादा वाढविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वेगमर्यादा कमी करणे गरजेचे आहे.
- तन्मय पेंडसे, महामार्ग वाहतूक अभ्यासक

Web Title: Road Safety Vehicle Speed Control Police
 


संबंधित बातम्या

Saam TV Live