#SAAM HERO | चणे-फुटाणे विकून जेव्हा गरिबाचा मुलगा डॉक्टर होतो...

साम टीव्ही
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

 

  • चणे-फुटाणे विकणाऱ्यांचा मुलगा होणार डॉक्टर
  • दारिद्र्याच्या काट्यांमधूनही शोधला सुवर्णमार्ग
  • नांदेडच्या रामप्रसाद जुनघरेचं सर्वत्र कौतुक

पडकं घर.  पडेल ते काम करणारी आई आणि चणे-फुटाणे विकणारे वडील.  अशा सगळ्या परिस्थितीतही एका हीरोनं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण होण्यापर्यंत संयम, जिद्द, चिकाटीने कष्ट उपसत राहिला. लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणारा कोण आहे साम हीरो. पाहूयात. 

पडक्या घरात, अंधारात शेगदाणे निवडणाऱ्या या हातांमध्ये आता स्टेथोस्कोप येणारेय. अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुजलेलं असतानाही नांदेडचा रामप्रसाद आता डॉक्टर होणारेय. कुडाचं पडकं घर. आई गृहिणी.  वडिलांचा चणे-फुटाणे विकण्याचा व्यवसाय. मिळेल त्या चवली-पावलीवर फकीरराव जुनघरे संसाराचा गाडा हाकतायत. अशाही परिस्थितीत रामप्रसादने दहावीत 94 टक्के, बारावीत 84 टक्के गुण मिळवलेत.  आता तर नीट परिक्षेत 700 पैकी 625 गुण मिळवून वैद्यकीय प्रवेशासाठी रामप्रसाद पात्र ठरलाय.  आपल्या कष्टाला रामप्रसादने यशाचं कोंदण लावल्याचं सांगताना फकीरराव आणि सरस्वती यांच्या डोळ्यांतून अभिमान ओघळत राहतो.

डॉक्टर होण्याचं स्वप्न रामप्रसादच्या इवल्या-इवल्या डोळ्यांनी लहानपणीच पाहिलं होतं.  वडिलांना मदत व्हावी म्हणून रस्त्याकडेला शेंगदाणेही विकले.  पण अभ्यास मात्र सुरू ठेवला. त्यातून त्याने या यशाच्या राजमार्गावर पाऊल ठेवलंय.  नांदेड पोलिसांनीही रामप्रसादचा सत्कार करत त्याच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च उचललाय.

भवतालात संकटांचे डोंगर उभे असले तरी जिद्द, चिकाटी आणि अविरत मेहनत करण्याची तयारी असली की, आयुष्यात यशाचे पर्वत उभे करतात येतात. हेच रामप्रसादने सिद्ध करून दाखवलंय.  म्हणून साम हीरो असलेल्या रामप्रसादला मानाचा मुजरा.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live