संजय दत्तची अखेर कॅन्सरवर मात, चाहत्यांसमोर नतमस्तक होत व्यक्त केले आभार! वाचा कशी आहे संजूबाबाची जीवनकहाणी

साम टीव्ही
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

संजय दत्तने कॅन्सरवर मात केलीय. खुद्द संजय दत्तनेच ट्वीट करून ही माहिती दिलीय. वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांवर मात करणाऱ्या संजूबाबाचा प्रवास कसा घडलाय पाहूयात.

संजय दत्त... बाबा, संजूबाबा... अशी अनेक नावं... पण तो त्याच्या नावाने किंवा चित्रपटांनी जितका ओळखला जातो, तितकाच त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांवरून जास्त ओळखला जातो.  म्हणून तर त्याच्या आयुष्यावर चित्रपट आला आणि सुपर-डुपर हिटही ठरला. 29 जुलै 1959 साली जगात पाऊल ठेवताना संजूबाबा अभिनयाचा चमचा तोंडात घेऊनच जन्मला.  वडील सुनील दत्त आणि आई नर्गिस दत्त. लाडाकोडात वाढलेला संजू हाहा म्हणता मोठा झाला. अभिनेत्या आई-वडिलांचाच मुलगा तो. सिनेमात येणारच ना. त्याचा

पहिला सिनेमा रॉकी. 26 एप्रिलला रीलीज झाला. संजूबाबा आनंदात होता. पण... एक घटना घडली संजूबाबा कोसळून गेला. 3 मे 1981 रोजी संजूबाबाची आई सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं कॅन्सरने निधन झालं. आयुष्यातला पहिला सिनेमा रीलीज झाला पण जन्मदाती आई जग सोडून गेली. संजूबाबा खचून गेला. सिगारेट, दारूसह संजूबाबा ड्रग्जच्याही आहारी गेला. त्याचं व्यसन सुटावं म्हणून त्याला अमेरिकेत पाठवलं गेलं. उपचारानंतर संजूबाबा भारतात आला आणि पुन्हा सुरू झाला अभिनयाचा प्रवास. 

 त्यातच 1987 साली लग्न केलेल्या रिचा शर्माचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला. या संकटातून संजय दत्त बाहेर पडतोय न पडतोय तोच. 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. आणि संजय दत्तच्या आयुष्यातही मोठा खड्डा पडला. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला अटक झाली. 

जामिनावर असताना रिया पिल्लईसोबत लग्न केलं पण ते टिकलं नाहीच. घटस्फोट झाला.  ज्यांनी सर्वात मोठा आधार दिला त्या सुनील दत्त यांचं 2005 साली निधन झालं. त्यानंतर मात्र संजय दत्त एकाही लढत राहिला. 

अनेक सिनेमे केले. हिट झाले. नवी सोबत म्हणून मान्यता दत्तसोबत संजूबाबानं लग्न केलं. या सगळ्यात संजय दत्तची सुटकाही झाली. सगळं काही ठीकठाक चाललं असतानाच संजूबाबाला कॅन्सरचं निदान झालं.

आई, पहिली पत्नी आणि आता स्वत: संजय दत्त. कॅन्सरचा शाप तिघांनाही.  पण अनेक संकटांना लोळवणारा संजूबाबा खचला नाहीच. खरतनाक आजाराच्या छाताडावर पाय देऊन संजूबाबानं कॅन्सरला हरवून टाकलंय.  खुद्द संजय दत्तनेच ट्वीट करून ही बातमी दिलीय.

नुसता आवाज ऐकला तरी चेहऱ्यासमोर उभा राहतो बिनधास्त. रांगडा, खतरनाक, भावनिक अशा सगळ्यांचं मिश्रण असलेला संजू बाबा. कधी डोळ्यांतून टचकन् पाणी यावं, कधी मुठी आवळून संजूबाबाचा राग यावा, तर कधी त्याच्याबद्दल दया वाटावी असं त्याचं आयुष्य आहे.

संजूबाबा कसाही असला तरी लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. त्यामुळेच संजूबाबाने ट्वीट करून डॉक्टर आणि चाहत्यांचे आभार मानलेयत. असंख्य संकटांची सडक पार करणारा संजय दत्त म्हणूनच आजही मोठ्या अभिमानाने रसिकांसमोर नतमस्तक होतो.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live