राज्याची आरोग्य व्यवस्था झाली भंगार, पाहा आरोग्य व्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत?

राज्याची आरोग्य व्यवस्था झाली भंगार, पाहा आरोग्य व्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत?

ऍम्ब्युलन्स मिळत नसल्याने एका महिलेला चक्क हातगाडीवरून रुग्णालयात न्यावं लागतंय, तर नाशिकमध्ये अनधिकृत कोव्हिड सेंटरचा पर्दाफाश झालाय. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाल्याची ही लक्षणं आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात

राज्याच्या आरोग्य व्यवस्था किती भंगार झालीय त्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. घटना आहे भुसावळ शहरातली. कमलाबाई मालवीय यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यांच्या मुलाने ऍम्ब्युलन्ससाठी नगरपालिकेच्या चालकाला फोन केला. मात्र त्या मुर्दाड ड्रायव्हरने ऍम्ब्युलन्स घेऊन येण्यास नकार दिला. त्यामुळे कमलाबाईंना चक्क हातगाडीवरून नेण्याची वेळ आली. हा संकटाचा फेरा एवढ्यावरच थांबला नाही, तर दोन-तीन रुग्णालयांनी कमलाबाईंना दाखल करून घेण्यास नकार दिला. रात्री-अपरात्री धावाधाव करत कमलाबाईंना हातगाडीवर नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कमलाबाईंवर आता उपचार सुरू झालेत, मात्र या बेजबाबदार चालकावर नगरपालिका काय कारवाई करणार हाही प्रश्न आहेच.

हे झालं भुसावळचं, पण संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. त्यातच आता अनधिकृत कोव्हिड सेंटरचाही धंदा काही जणांनी सुरू केलाय. नाशिकच्या खुटवड येथे अशाच एका अनधिकृत कोव्हिड सेंटरचा पर्दाफाश झालाय. खुटवडच्या माहेरघर मंगलकार्यात काही बाजारबुणग्या भामट्यांनी हे कोव्हिड सेंटर सुरू केलंय. इतकंच नाही, तर वापरलेले कपडे, इंजेक्शन आणि औषधं मंगलकार्यालयाच्या परिसरात टाकली जात होती.

कोरोनाबाबात कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा बडेजाव सरकार मिरवत असलं तरी, ऍम्ब्युलन्स मिळत नाही म्हणून रुग्णांना हातगाडीवरून नेण्याची वेळ आलीय. तर सरकारी कोविड सेंटर भंगारात निघालेली आहेत. असं असताना आता अनधिकृत कोव्हिड सेंटरचाही बाजार मांडला गेलाय. याचा अर्थ एकच निघतो, तो म्हणजे सरकारी यंत्रणा कोमात, आरोग्य व्यवस्था भंगारात आणि लोकांचा जीव रामभरोसे झालाय. एवढं मात्र नक्की.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com