विधान परिषदेसाठी मुंडे, पंडित, क्षीरसागर, रजनी पाटलांची चर्चा; कोणाला मिळणार संधी?

विधान परिषदेसाठी मुंडे, पंडित, क्षीरसागर, रजनी पाटलांची चर्चा; कोणाला मिळणार संधी?

बीड : दीड महिन्यांनी आमदारांतून निवडून द्यायच्या आणि त्यानंतर राज्यपाल नियुक्त अशा विधान परिषदेच्या साधारण १९ जागा भरल्या जाणार आहेत. सत्तेमुळे महाविकास आघाडीचा वाटा अधिक असणार आहे. पण, यातला किती वाटा जिल्ह्याला मिळतो याकडे लक्ष लागले आहे. आमदारांतून निवडुण द्यायच्या सात पैकी भाजपच्या तीन जागा सहज विजयी होणाऱ्या आहेत. यात कोणाची वर्णी लागते याकडेही लक्ष आहे. 

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर व काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सदस्या आणि हिमाचल काँग्रेसच्या प्रभारी रजनी पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

पक्षासाठी योगदान देणाऱ्या किंवा राजकीय नेत्यांचे पुनर्वसन म्हणून विधान परिषदेवर आमदारकी दिली जाते. राज्यपाल नियुक्त्या ह्या विशिष्ट योगदान दिलेल्यांसाठी असल्या तरी अलिकडे यातही सत्ताधारी पक्षांच्याच नेत्यांच्या नेमणूका होतात. 

एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या सात जागांसाठी निवडणुक आहे. आमदारांतून निवडुण द्यायच्या जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे तीन आमदार सहज विजयी होतील असे गणित आहे. तर, महाविकास आघाडीचे चार आमदार विजयी होतील. तर, राज्यपाल नियुक्त्यांमध्ये सहाजिकच महाविकास आघाडीचेच बारा जणांना आमदारकी मिळणार यात शंका नाही.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झालेला आहे. त्यांचे नावही यासाठी आघाडीवर आहे. मात्र, त्या नेत्या असल्याने पुनर्वसनाची गरज नाही असे समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, पंकजा मुंडेंची इच्छा आणि पक्षाचे गणित यावर पुढील निर्णय अवलंबून आहे. परंतु, त्या व्यक्तीगत स्वत:च्या आमदारकीसाठी प्रतिष्ठा करणार नसल्या तरी जिल्ह्यातील एखाद्या समर्थकाला आमदारकी मिळवून देतात का, हेही पहावे लागणार आहे. परंतु, परिषदेच्या तीन जागांमध्ये पक्षाला त्यांच्या मताचा विचार करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचेही नाव आघाडीवर आहे. मधल्या काळात पक्षातील तथाकथित बंडात त्यांनी बजावलेली भूमिका आणि जिल्ह्यात पक्षाचे सामाजिक बॅलेन्स करण्यासाठी म्हणून त्यांचे नाव आघाडीवर येत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्याही श्री. पंडित विश्वासातले आहेत. मोठ्या पवारांच्या बैठकीत त्यांना जागा ही त्यांची अधिक जमेची बाजू असल्याने त्यांना संधी मिळेल, असा समर्थकांचा विश्वास आहे.

शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांनाही विधान परिषदेवर संधी मिळेल, असा समर्थकांना विश्वास आहे. शिवसेनेतील मातब्बर असलेल्या क्षीरसागरांचा विधानसभेत पराभव झाला. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे पक्ष त्यांचे पुनर्वसन करेल असे मानले जात असले तरी त्यांनी विरोध केलेल्या शरद पवारांचा या सरकारवर असलेला प्रभाव ही त्यांची मोठी अडचण मानली जात आहे.

रजनी पाटील या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी या दोघांच्याही जवळच्या आहेत. त्यांच्याकडे हिमाचल प्रदेश काँग्रेसचे प्रभारीपद असून एखाद्या राज्याचे प्रभारी ही मानाची जबाबदारी मानली जाते. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्याही नावाचा विचार करावा लागेल वा कदाचित त्यांचे नाव वरतूनही येऊ शकते, असे समर्थक सांगतात.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com