कोकणात होलिकोत्सवावर निर्बंध, घरोघरी पालखी नाचवण्यास बंदी

कोकणात होलिकोत्सवावर निर्बंध, घरोघरी पालखी नाचवण्यास बंदी

यंदा कोकणातल्या शिमग्यात पालखी नाचवायला बंदी करण्यात आलीय. या निर्णयामुळं कोकणी माणसात नाराजी आहे. कोरोनाचं लवकर उच्चाटन कर असं गाऱ्हाणंच कोकणी माणसानं गावदेवाला घातलंय.

कोकणी माणूस गणेशोत्सव आणि होळी या दोन सणांना कुठंही असला तरी गावाला जातोच.होळीत घरोघरी नाचवली जाणारी पालखी  आणि धुळवड हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पण यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं घरोघरी पालखी नाचवण्यात बंदी घालण्यात आलीय.   पालखी गर्दीमध्ये नाचविता येणार नाही.मंदिर विश्वस्त- पालखीधारकांना चाचणी बंधनकारक करण्यात आलीय. मोजक्या लोकांनाच पालखीची रूपे लावण्याचं बंधन घालण्यात आलंय. पालखी भेटीसाठी मानकऱ्यांसह २५ ग्रामस्थांना परवानगी आहे. दर्शनाच्या वेळा ठरवून देण्याचे निर्देश दिलेत. शिवाय सहाणेवर दर्शनासाठी दिवस नेमून देण्यात सांगितलंय. कोरोनामुळं होळीचा बेरंग झाल्यानं कोकणी माणसानं थेट गावदेवासमोर गाऱ्हाणं घातलंय.

होळीत यंदा पालखी नाचवायला मिळणार नाही. कोविड सक्ती असल्यानं चाकरमानी गावी येण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळं यंदा कोकणातल्या होळीत उत्साहाचे रंग नसतील अशी खंत कोकणी माणसात आहे.
कोकणकर यंदा शिमग्यात घरोघरी पालखी नेण्यावर बंधने; चाकरमान्यांना कोरोना चाचणी अत्यावश्‍यक

रत्नागिरी : कोकणातील शिमगा म्हणजे चाकरमान्यांच्या हृदयातला हळवा कोपरा. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणेशोत्सवासाठी अवश्य गावाला जातो. शिमगा म्हटला की कोकणी माणसाच्या अंगात संचारतं, शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचू लागते, बोंबा कानात घुमतात. पण यंदाच्या शिमगोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. शिमगोत्सवाच्या निमित्ताने पालखी नेण्यावर बंधने घालण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

कोविड-19च्या अनुषंगाने यंदा सर्व धर्मियांचे सण, उत्सव तसंच सर्व सार्वजनिक कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तसंच शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्यावरुन नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीचा विचार करत यंदा रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणं आवश्यक आहे, असं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

छोट्या होळ्या आणून मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होम करावा
मुंबईकरांनी गावी न येण्याचे आवाहन करावे
केबल नेटवर्क, फेसबुक व वेबसाईट आदीद्वारे चाकरमान्यांना होळीचा कार्यक्रम पाहणे शक्‍य होईल
प्रतिबंधित क्षेत्रामधून रत्नागिरी जिल्ह्यात होळीसाठी येणाऱ्यांकडे ७२ तासांपूर्वीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल आवश्‍यक
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लोकांना एसपीओ २ चाचणी व थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक
लोकांच्या सोयीसाठी नागरी व ग्राम कृतिदलामार्फत स्क्रिनिंग सेंटर उभारावेत
या केंद्रांवर सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवावे
कोरोनासदृश लक्षणे असल्यास संबंधितास शिमगोत्सवात सामील होता येणार नाही 
पन्नासपेक्षा अधिक लोकांची गर्दी झाल्यास, आदेशाचे उल्लंघन केल्यास आणि कोरोनाचा शिरकाव दिसून आल्यास ते क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले जाईल
खेळे, नमन आदी कार्यक्रम आयोजित करू नयेत
धूलिवंदन व रंगपंचमीला रंग उधळण्याचे टाळावे
छोट्या-छोट्या समूहात रंगपंचमी करावी.

पालखीसाठी नियमावली

पालखी घरोघरी नेण्यात येऊ नये
पालखी गर्दीमध्ये नाचविता येणार नाही
मंदिर विश्वस्त- पालखीधारकांना चाचणी बंधनकारक
 मोजक्‍या लोकांनीच पालखीची रूपे लावावी
 पालखी भेटीसाठी मानकऱ्यांसह २५ ग्रामस्थ 
 पालखी शक्‍यतो वाहनातून न्यावी.
 पालखीबरोबर ५० पेक्षा अधिक गर्दी नको
 दर्शनाच्या वेळा ठरवून द्याव्यात. 
 सहाणेवर दर्शनासाठी दिवस नेमून द्यावा 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com