"मंत्रालयावर भगवा फडकला, हे बाळासाहेबांचेच यश"

"मंत्रालयावर भगवा फडकला, हे बाळासाहेबांचेच यश"

आज महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झालेला असताना बाळासाहेब देहाने आपल्यात नाहीत, पण मंत्रालयावर भगवा फडकणे हे त्यांचेच यश आहे," असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

17 नोव्हेंबर, 2012 हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन. यानिमित्ताने आज सामनाच्या अग्रलेखात बाळासाहेबांना वंदन करण्यात आले आहे. अग्रलेखात बाळासाहेब यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. 

"बाळासाहेबांमुळे महाराष्ट्र, मराठी माणूस, हिंदुत्व सतत विजयी होत राहिले. संकटाच्या छाताडावर पाय रोवून ते लढत राहिले! बाळासाहेब हे मनुष्यच होते, पण ते अमर आहेत. ते दैवीपुरुष होते, पण देवानांही त्यांच्या लोकप्रियतेचा, त्यांच्यावरील श्रद्धेचा हेवाच वाटत असावा. सन 1969 ते 2012 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर फक्त एकाच माणसाचा प्रभाव होता. 1991 ते 2012 पर्यंत देशातील हिंदू समाजाचे भवितव्य केवळ एका व्यक्तीच्या हाती होते. ती व्यक्ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे " असे अग्रलेखात म्हटले आहे. 

सत्ता हेच त्यांच्यासाठी यश नव्हते..
देशाच्या राजकारणावर जबरदस्त पकड ठेवणारे, लोकांची नाडी अचूक ओळखून निर्णय घेणारे बेमिसाल नेतृत्व म्हणून बाळासाहेबांची कीर्ती दुमदुमत राहील. लोकांनी बाळासाहेबांना अवतारी पुरुष मानले. अवतारी व्यक्तीच्या लक्षणांपैकी शौर्य, भाग्य आणि श्रद्धा ही लक्षणं बाळासाहेबांच्या जीवनात प्रतित झाली. वैभव आणि यशाच्या मागे ते कधीच लागले नाहीत, पण कीर्ती, यश त्यांच्या मागे आपसूक आले. सत्ता हेच त्यांच्यासाठी यश नव्हते. कमालीची लोकप्रियता, लोकांना त्यांनी दिलेला विश्वास हेच त्यांचे यश होते. यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी स्वर्गारोहण केले. वाद, मतभेद, संकटे या सर्वांवर आपल्या ताकदीने मात करून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर हिंदुस्थानच्या नेत्यांत निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध करून बाळासाहेबांनी आपली जीवनयात्रा संपवली. 

'सामना'च्या अग्रलेखात काय म्हटलं आहे..

मुंबई-महाराष्ट्रातील रोजगारावर पहिला हक्क भूमिपुत्रांचाच. या लढय़ाची ठिणगी पन्नास वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी टाकली. त्या विचारांचा प्रसार आज देशभर झाला आहे. प्रादेशिक अस्मिता आणि स्थानिकांना रोजगार यावरच आज निवडणुका लढवल्या जात आहेत (बिहारातही काल तेच दिसले). त्याचे श्रेय बाळासाहेबांनाच द्यावे लागेल. देशभरात प्रादेशिक पक्षांचे ‘राष्ट्रीय’ राजकारण आज जोरात सुरू आहे. त्याचे जनकत्व शिवसेनाप्रमुखांकडेच जाते. देशाच्या राजकारणात प्रादेशिक अस्मितेचा आवाज ऐकला गेला नाही तर अराजकाची ठिणगी पडेल हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे हेच होते. त्यांनी मराठी माणसांचा लढा धगधगत ठेवून पुढे हिंदुत्वाची मशाल हाती घेतली. राममंदिराच्या लढय़ात ते मर्दासारखे रणमैदानावर उभे राहिले. बाबरीच्या पतनानंतर भल्याभल्यांनी हात वर केले तेव्हा हिंदूंचे तारणहार म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच गर्जना करीत पुढे आले. ‘बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे’अशी सिंहगर्जनाच त्यांनी केली. या गर्जनेने संपूर्ण देश रोमांचित झाला. वीज कडाडून तुफान निर्माण व्हावे तसे हिंदुत्वाचे तुफान देशात आले. त्याच तुफानाच्या लाटा आजही उसळत आहेत. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com