कोल्हापुराला यंदाही पुराचा धोका, सांगलीतही पावसाचा जोर वाढता... वाचा काय आहे सध्याची परिस्थिती

कोल्हापुराला यंदाही पुराचा धोका, सांगलीतही पावसाचा जोर वाढता... वाचा काय आहे सध्याची परिस्थिती

कोल्हापूरातल्या करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली ते वरांगे पाडळी हा रस्ता बंद झालाय. प्रयाग चिखली इथल्या पंचगंगा नदीवरील पुलावरुन पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झालीय. या परिसरातील ऊसाच्या शेतीत मोठ्या प्रमाणावर पाणी गेलंय. त्यामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय.

गेल्या वर्षीच्या पुरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रयाग चिखली आणि आंबेवाडी या गावांचं खूप मोठं नुकसान झालं होतं. आता पंचगंगा नदीचं पाणी जसंजसं वाढू लागलयं तसतसं या सर्व गावांतील लोकांमध्ये पुन्हा भितीचं वातावरण आहे. गेल्या वर्षीच्या अनुभवानंतर त्यांनी आता स्थलांतर करायला सुरुवात केलीये. प्रशासनादेखील त्यांनी स्थलांतरीत होण्याच्या सूचना केल्यात.

कोल्हापूरमधील पुराला समोरे जाण्यासाठी प्रशासनाने तयारी केलीय.. धरणांमधील पाण्याचे नियोजन करण्यासाठी धरणक्षेत्रातील सर्व  जिल्हाधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काही अडचण येणार नाही, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. 

सांगली  जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय... तर शिराळा तालुक्यात चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने वारणा नदी पात्राबाहेर आलीय. तालुक्यातील काखे-मांगले हा पूल आणइ अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली. कृष्णा नदीची पातळी ही 20 फुटांवर गेलीय. जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी आहे.  सांगली शहरासह आसपासच्या ग्रामीण भागात संततधार पाऊस पडतोय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. गेल्या २४ तासात शिराळा परिसरात १४० मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. त्यामुळे चांदोली धरणात २.४१ टीएमसीपर्यंत पाणीसाठा वाढलाय..

मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज बंधारा पाण्याखाली गेलाय. सांगली जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ  झालीये. सततच्या पावसामुळे मौजे डिग्रज बंधारा पाण्याखाली गेलाय. त्यामुळे इथले रस्ते पाण्याखाली गेलेत. वाहतूकही ठप्प झाल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

बेळगावमध्ये पुराच्या पाण्य़ाने थैमान घातलंय. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने ही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. कोयना धरणातून सध्या 1.2 लाख क्युसेक इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. कोयना धरण परिसरात सध्या विक्रमी पाऊस होतोय. त्यामुळे कोयना धरण प्राधिकरणाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पावसचा जोर कायम राहिला तर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com