VIDEO | महाराष्ट्राच्या शेतीला गांजाची कीड, धुळे बनलं गांजाचं हब, मुंबईचंही कनेक्शन

VIDEO | महाराष्ट्राच्या शेतीला गांजाची कीड, धुळे बनलं गांजाचं हब, मुंबईचंही कनेक्शन

ज्या महाराष्ट्राच्या कपाळी शेतीचा हिरवागार मळवट लाभलाय. त्याच महाराष्ट्राच्या शेतीला गांजाची कीड लागलीय की काय असा प्रश्न पडतोय.  कारण राज्यात तब्बल दीड हजार एकरवर गांजाची छुपी शेती होत असल्याचं उघड झालंय. पाहूयात.

महाराष्ट्रातील शेतीला आता गांजाची कीड लागल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. महाराष्ट्रातील धुळे, जळगावसह अनेक भागांत गांजाची छुपी शेती होत असल्याचं वास्तव धडधडीतपणे समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल दीड हजार एकर क्षेत्रावर गांजाची शेती होत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे गांजाचं सेवन का होतं आणि त्याचे आरोग्याला किती घातक आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

गांजामुळे प्रचंड झोप येणे, अगदी बेशुध्दीचीही अवस्था येऊ शकते. त्याचसोबत, भास होणे, खूप आनंद वाटणे वगैरे परिणामांमुळे गांजा नियमितपणे घेण्याकडे व्यक्तीचा कल वाढतो. गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास भूक मंदावणे, अशक्तपणा, थरथर, गोंधळल्यासारखे वाटणे, लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम होतात. गांजामुळे श्वसन थांबून मृत्यू येण्याचीही शक्यता असते.

गांजाची शेती करणाऱ्यांना पोलिसांसह शासकीय अधिकाऱ्यांची साथ असून चिरीमिरीसाठी गांजा लावणाऱ्यांना अभय मिळत असल्याचा आरोप होतोय.

ग्रामीण भागात मिरची, कोथिंबिरीच्या पिकांसोबत गांजाची छुपी शेती केली जाते. या गांजाला मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागांतून मोठी मागणी असते. विशेषकरून तरुण मुलं गांजाच्या आहारी गेल्याचं आढळून येतं. गांजाचं व्यसन करणारे गांजासाठी अनेक कोडवर्ड वापरत असल्याचं दिसून येतं.

गांजाचं व्यसन करणारे गांजासाठी माल, हरीपत्ती, धुवा अशा नावाने संबोधत असतात. त्याचसोबत विड, छोटा पॅकेट, खेती अशा कोडवर्डनेही गांजाचा उल्लेख होतो.

गांजाप्रकरणी कॉमेडियन भारती आणि तिच्या पतीच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील गांजाची शेती ऐरणीवर आलीय. मुळात महाराष्ट्राच्या कपाळी शेतीचा हिरवागार मळवट भरला गेलाय. अनेक शेतकरी क्रांतिकारी प्रयोग करत असताना, ही गांज्याच्या शेतीची अवदसा सुचलेल्यांच्या मुसक्या आवळायलाच हव्याच. त्याचसोबत गांजाची शेती रोखण्याची जबाबदारी असणाऱ्यां अधिकाऱ्यांनाच लाचखोरीची झिंग चढली असेल तर ती वेळीच उतरवायला हवी.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com