उदयनराजेंचे अजून काही ठरेना.....

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

 

 

सातारा : साताऱ्याचे डॅशिंग खासदार उदयनराजेंनी जर राजीनामा दिला तर लोकसभा (पोटनिवडणुक) आणि येणारी विधानसभा निवडणूक या एकत्र घ्याव्यात अशी खुद्द उदयनराजेंची अट आहे. तस जर नाही झालं तर उदयनराजेंना संभाव्य धोका स्पष्ट दिसत आहे. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये हातात फार कमी अवधी राहिला असल्याने राजेंची अट पूर्ण होणे मुश्किल आहे, असे विश्वसनीय सूत्रांचे सांगणं आहे. म्हणून भाजप उदयनराजेंसाठी नवीन कोणता फॉर्म्युला आणणार की स्वतः उदयनराजे राष्ट्रवादीतच राहून पवार साहेबांचा बालेकिल्याचे निसटलेले बुरुज पुन्हा उभे करणार हे आता पाहावं लागेल. त्यामुळे नेहमीच धडक निर्णय घेणार उदयनराजे या वेळी मात्र जपून पाऊल टाकताना पाहायला मिळत आहेत.

उदयनराजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे आधीच भाजपवासी झाल्याने जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त पक्ष मोडकळीस आला. त्यात उदयनराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाची काय अवस्था होईल याचा विचार करूनच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची गाळण उडाली.

मग उदयनराजेंना मनवण्यासाठी पहिल्यांदा आमदार शशिकांत शिंदेंनी सर्व तोपरी प्रयत्न केले. पण, हाती निराशाच आली. उलट राजेंनी शिंदेंनाच खासगीत भाजपमध्ये जाण्याची ऑफर दिल्याची पक्की खबर कानावर आली. त्यानंतर ही जबाबदारी आली ती सध्याचे राष्ट्रवादीची धडाडती तोफ अमोल कोल्हे यांच्यावर. कोल्हे यांनी सातारा येथील रेस्ट हाऊसमध्ये राजेंच्या बरोबर चर्चा केली. पण, तोही प्रयत्न निष्फळ ठरला. भेटीबाबत अमोल कोल्हेंना विचारले असता त्यांनी मावळा कधी राजेंची समजूत घालत नाही असे सिरीयल स्टाईल उत्तर दिले. त्यानंतर ही जबाबदारी आली ती शेतकरी नेते राजु शेट्टी यांच्याकडे. शेट्टी जेव्हा राजेंना भेटायला आले तेव्हा राजेंनी त्यांचे मिठी मारून स्वागत केले. चहा पाणी झाल्यावर दोघांमध्ये चर्चा देखील झाली. मात्र या वेळी राजेंबाबत राजु शेट्टी यांनी त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय आजून झाला नसल्याचे सांगितले.

या सगळ्यामध्ये खासदार उदयनराजेंनी मात्र त्यांची भूमिका जाहीर केली नाही. एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले तर एकदा त्यांनी चंद्रकांतदादांना इशारा दिला. एकदा त्यांनी मागील सरकारच्या काळात माझी अनेक कामे पूर्ण होऊ शकली नसल्याची खंत व्यक्त केली. तर एकदा लोकांच्या हित लक्षात घेऊन भविष्यात निर्णय घेऊ असे देखील सांगितले. 

Web Title: Satara MP Udyanraje Bhosale not take decision
 


संबंधित बातम्या

Saam TV Live