शरद पवार म्हणाले, भालकेंचे अकाली निधन चटका लावणारे...

साम टिव्ही
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

शरद पवारांनी ट्विटरवर भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६०) यांचे शुक्रवारी  मध्यरात्री पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भालकेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, त्यांचे निधन चटका लावून जाणारे असल्याचे म्हटले आहे. 

काल दुपारी शरद पवार यांनी रूबी हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील डॉक्टरांकडे आमदार भालकेंच्या प्रकृतीविषयी चौकशी केली होती. आमदार भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. भालके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, तीन विवाहित मुली, सून नातवंडे असा परिवार आहे. 

शरद पवारांनी ट्विटरवर भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

गेल्या काही वर्षांपासून भालके यांना किडनीचा त्रास होत होता. मुंबईतील डाॅक्टरांकडे ते तपासणीसाठी जात असत. आमदार भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातदेखील केली होती. मात्र त्यांना आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे उपचारासाठी रूबी हाॅस्पीटलमध्ये दाखल केले होते.  गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची शुक्रवारी मध्यरात्री प्राणज्योत मालवली. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास वाढल्याने आज दिवसभर त्यांची प्रकृती चिंताजनक  होती.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live