दिल्लीच्या तख्तापुढे झुकू देणार नाही- शरद पवार 

दिल्लीच्या तख्तापुढे झुकू देणार नाही- शरद पवार 

मुंबई - ‘‘दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात नाहीत. तेच संस्कार आमच्यातपण आहेत. छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकू देणार नाही,’’ अशा शब्दांत ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता शरसंधान साधले. सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा नोंदवल्याने पवार यांनी केंद्र सरकारलाच आव्हान देत शुक्रवारी (ता. २७) दुपारी दोन वाजता ‘ईडी’च्या कार्यालयात जाणार असल्याची घोषणा केली. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. दरम्यान, काँग्रेसने शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. 

राज्य सहकारी बॅंकेच्या कर्जवाटपप्रकरणी कथित गैरव्यवहारावरून बॅंकेच्या ७० संचालकांसोबत शरद पवार यांच्यावर ‘ईडी’ने गुन्हा नोंदवला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘ईडी’च्या या कारवाईने राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत आज शरद पवार यांनी ‘ईडी’च्या कारवाईचे स्वागत करताना ज्या बॅंकेचा आपण कधीही संचालक नव्हतो, त्या बॅंकेच्या व्यवहाराबाबत गुन्हा नोंदवल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त केले. मात्र, आपण शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेचे पाईक असून लोकशाही व्यवस्थेवर निष्ठा ठेवणारे आहोत. त्यामुळे ‘ईडी’ने केलेल्या कारवाईला सामोरे जाणार असल्याचे ते म्हणाले.

‘‘सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने राज्यभरात महिनाभर प्रचाराला बाहेर फिरावे लागणार आहे. त्यादरम्यान ईडीने काही ‘प्रेमाचा संदेश’ पाठवला तर मी मुंबईत उपलब्ध असेलच असे नाही. मात्र, अशावेळी मी गैरहजर राहिलो, असा ‘ईडी’चा समज व्हायला नको म्हणून मी स्वत: शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाऊन माझ्यावरील आरोपांची माहिती घेणार आहे. दरम्यान ‘ईडी’ने काही पाहुणचार केल्यास तो स्वीकारण्याची माझी तयारी आहे,’’ असा टोलाही पवार यांनी लगावला. 

आयुष्यातला दुसरा प्रसंग...
शरद पवार म्हणाले की, अशाप्रकारे गुन्हा नोंद होण्याचा माझ्या आयुष्यातील दुसरा प्रसंग आहे. याअगोदर १९७८ ला जळगाव ते अमरावती अशी शेतकरी दिंडी काढली होती. त्या वेळी माझ्यावर गुन्हा नोंदवून खटला भरण्यात आला होता. मात्र, त्या खटल्यात मी निर्दोष मुक्‍त झालो होतो. आता हा दुसरा प्रसंग आहे की माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे. या सर्व कारवाईला लोकशाही मार्गाने मी समोरे जाण्यास तयार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.


Web Title:Web Title: Sharad Pawar will not bow down to Delhi's board

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com