लवकरच मिळणार 10 रूपयांत शिवभोजन 

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 25 डिसेंबर 2019

राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ १० रुपयांत शिवभोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तीन महिन्यात ६ कोटी ४८ लक्ष खर्च अपेक्षित आहे.

मुंबई: गरीब व गरजू जनतेला लवकरच १० रुपयांत शिवभोजन मिळणार आहे.  त्यासाठी आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. शिवभोजनसाठी तीन महिन्यात 6 कोटी 48 लाख खर्च येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. 

मंत्रिमंडळातील बैठकीत  शिवभोजनासह महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यालादेखील मान्यता मिळालीय.  सुरूवातीला शिवभोजन प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात मिळणार आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केलीय.

शिवभोजनात काय मिळणार? 

शिवभोजनात 2 चपात्या,भाजी,भात आणि वरण मिळणार आहे. दहा रुपयांच्या थाळीसाठी प्रत्यक्षात जवळपास ५० रुपयांचा खर्च येणार असल्याने उर्वरित ४० रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव होता. ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या घोषणेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ही योजना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी फंडातून (सीएसआर) राबवण्याबाबतचा विचार होता. मात्र स्वस्तातील जेवण थाळीची ही योजना सीएसआर फंडाच्या मूळ हेतूला अडचण निर्माण करणारी ठरणार असल्याने यासंदर्भात अन्न आणि नागरी पुरवठा खात्याला प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. मात्र या योजनेसाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणी यांसाठी यंत्रणा नसल्याने अन्न व नागरी विभागाची अडचण झाली. शिवाय जनतेला स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्याचे काम अन्न व पुरवठा विभागाचे असून अन्न शिजवून देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे येत नाही. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने ही योजना राबविण्याऐवजी महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहात प्रयोगिक तत्त्वावर ही योजना राबवावी, असा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने सादर केला होता.

 

 

WebTittle::  Shiv Meal will be available for Rs 10


 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live