मुंबई पालिकेतही शिवसेना-कॉंग्रेस दोस्ताना

सरकारनामा
रविवार, 8 मार्च 2020

शिवसेनेसोबत कॉंग्रेसचा नवा दोस्ताना झाला असून राज्याप्रमाणे मुंबई महापालिकेतही महाविकास आघाडी फॉर्म्युला तयार होताना दिसत आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडेच ठेवून सत्ताधारी शिवसेनेने भाजपची कोंडी केली आहे. शिवसेनेसोबत कॉंग्रेसचा नवा दोस्ताना झाला असून राज्याप्रमाणे मुंबई महापालिकेतही महाविकास आघाडी फॉर्म्युला तयार होताना दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणेही बदलण्याची दाट शक्‍यता आहे. त्याची झलक मुंबई महापालिकेत दिसून आली. मागील महापालिका निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा जण शिवसेनेत दाखल झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ वाढले. त्या वेळी महापौरांनी विचारणा केल्यावर भाजपने विरोधी पक्षनेतेपदावरील दावा सोडला होता. महापालिकेतील समित्यांमध्ये कोणतेही पद न घेता पहारेकऱ्याची भूमिका बजावण्याचे भाजपने ठरवले होते.

त्यानंतर तीन वर्षांनी भाजपने महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून, तसे पत्र 28 फेब्रुवारीला महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले. विरोधी पक्षनेतेपदी आणि महापालिकेतील भाजप गटनेतेपदी प्रभाकर शिंदे यांची निवड केली असून, त्यांच्या नावाची सभागृहात घोषणा करावी, अशी मागणी पत्रात होती. त्यानुसार गेल्या गुरुवारी महापालिका सभागृहात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या गटनेतेपदावर शिंदे यांची निवड झाल्याचे जाहीर केले; मात्र विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा यापूर्वीच झाली असल्याचे सांगत भाजपची मागणी फेटाळली. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.

विरोधी पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्‍न

महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे आहे. भाजपला डावलण्याच्या महापौरांच्या निर्णयाचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी स्वागत केले आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची बदलती भूमिका म्हणजे महापालिकेतही महाविकास आघाडीचे संकेत असल्याची चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेतेपदी राहून शिवसेनेला साथ द्यायची, भाजपची कोंडी करायची, असा प्रयत्न कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सप यांच्याकडून केला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कॉंग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

संघर्षाचे संकेत

शिवसेना आणि भाजप यांच्यात सामना रंगणार आहे. महासभा, स्थायी समिती, वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये या दोन्ही पक्षांत संघर्ष झडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भाजपच विरोधी पक्ष आणि पहारेकऱ्याच्या भूमिकेत दिसण्याची शक्‍यता आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी भाजप न्यायालयात गेल्यास शिवसेनेची अडचण होण्याची शक्‍यता आहे.

WEB TITLE- Shiv Sena-Congress friendly in Mumbai municipality


संबंधित बातम्या

Saam TV Live